साडेचारशे प्रकरणे निकाली
By Admin | Updated: April 9, 2016 23:38 IST2016-04-09T23:34:05+5:302016-04-09T23:38:07+5:30
अहमदनगर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि शहर वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय मासिक लोक अदालत या उपक्रमात प्रलंबित आणि खटलापूर्व अशी ४६८ प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली

साडेचारशे प्रकरणे निकाली
अहमदनगर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि शहर वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय मासिक लोक अदालत या उपक्रमात प्रलंबित आणि खटलापूर्व अशी ४६८ प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली आहेत. जिल्हा न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोकअदालत झाली. प्रलंबित आणि खटलापूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी ही लोकअदालत आयोजित करण्यात आली होती. प्रलंबित १ हजार ८२८ प्रकरणांपैकी ४१० प्रकरणे तडजोडीने मिटली आहेत. त्यामध्ये २ कोटी ८७ लाख ६४ हजार ४०२ रुपयांची वसुली झाली आहे. खटलापूर्व प्रकरणांची संख्या १ हजार ६४४ एवढी होती. त्यामध्ये ६८ प्रकरणे तडजोडीने मिटली आहेत. यामधून संबंधित शासकीय संस्थांची १ लाख ९८ हजार ६४ रुपयांची वसुली झाली. या प्रकरणांची सोडवणूक करण्यासाठी वकील आणि न्यायाधीशांचे १६ पॅनल नेमण्यात आले होते. या पॅनलने दावे निकाली काढताना वादी, प्रतिवादीची मते जाणून घेत निकाल सुनावला़ या तडजोडी दोघांनीही तडजोडी मान्य केल्या़ राष्ट्रीय लोकअदालत या उपक्रमाचे शनिवारी सकाळी प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष एल. बी. कचरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम. एच. शेख, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील आदी उपस्थित होते.औद्योगिक न्यायालयात १२ प्रकरणे सावेडी येथील औद्योगिक व कामगार न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. तडजोडीसाठी ४१ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यामध्ये १२ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्याद्वारे नुकसान भरपाई पोटी द्यावयाची ४ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम वसूल झाली. ती पक्षकारांना देण्यात आली. न्यायाधीश एस. एन. साळवे आणि पी. व्ही. पवार यांनी तर अॅड. सुधीर टोकेकर, अॅड. अनिरुद्ध टाक, अॅड. के. के. पगार, अॅड. अर्चना कुलासकर यांनी सदस्य म्हणून काम पाहिले. ४या उपक्रमात कामगार व मालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपक्रमासाठी न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. प्रलंबित प्रश्न सुटल्याने पक्षकारांनी समाधान मानले़