नागरिकांच्या पत्रावर तात्काळ कार्यवाही करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:46 IST2020-12-17T04:46:05+5:302020-12-17T04:46:05+5:30
अहमदनगर : महापालिकेत सामान्य नागरिकांसह नगरसेवकांची पत्रे येतात. मात्र, त्यावर प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे नागरिकांच्या पत्रावर तात्काळ ...

नागरिकांच्या पत्रावर तात्काळ कार्यवाही करा
अहमदनगर : महापालिकेत सामान्य नागरिकांसह नगरसेवकांची पत्रे येतात. मात्र, त्यावर प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे नागरिकांच्या पत्रावर तात्काळ कार्यवाही करण्याचा आदेश आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिला, तसेच पत्रावर केलेल्या कार्यवाहीची त्रयस्थ व्यक्तीकडून चौकशी करण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली.
महापालिका आयुक्त मायकलवार यांच्या उपस्थितीत विभागप्रमुखांची बुधवारी आढावा बैठक झाली. या बैठकीस मनपातील सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. प्रभागातील विविध समस्यांबाबत संबंधित विभागाकडे पत्रव्यवहर केला जातो; परंतु त्यास उत्तर मिळत नाही, अशी नगरसेवकांची तक्रार आहे, तसेच कर वसुली प्रकरणात पालिकेकडून करदात्यांशी पत्रव्यवहार केला जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. पालिकेत आलेल्या पत्रांवर कार्यवाही होत नसल्याने आयुक्त मायकलवारही चांगलेच संतापले. त्यांनी विभागाकडे महिनाभरात किती पत्रे आली, त्यावर काय कार्यवाही झाली, याचा आढावा घेत विभागप्रमुखांना खडेबोल सुनावले. यापुढे अशी दिरंगाई खपूवन घेणार नाही, अशी तंबीही आयुक्तांनी दिली. विभागाकडे आलेल्या प्रत्येक पत्राची नोंद घेऊन त्यावर काय कार्यवाही झाली, त्याचीही नोंद करण्याची सूचना आयुक्तांनी केली. पत्रावर कार्यवाही करण्यासाठी मुदत देण्यात आली असून, दिलेल्या मुदतीतच कार्यवाही करा, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
....
स्वच्छ भारत अभियानात सर्व विभागांचा सहभाग
महापालिकेने स्वच्छ भारत अभियानात सहभाग घेतला आहे. केंद्रीय पथक पाहणीसाठी येणार असल्याने कुठल्या विभागाने कोणती कामे करणे आवश्यक आहे, याची माहिती तांत्रिक समितीकडून सर्व विभागप्रमुखांना देण्यात आली. त्यानुसार संबंधित विभागांनी कार्यवाही करण्याबाबत आयुक्तांनी सूचना केल्या असून, पुढील आठवड्यातील बैठकीत सदर कामांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
...
समन्वय नसल्याने रस्त्यांची दुरवस्था
रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ड्रेनेज, पाण्याची लाइन टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात येतात. कोणते काम केव्हा करावे, याबाबत पाणीपुरवठा व बांधकाम विभागात समन्वय नाही. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे सांगून याबाबत दोन्ही विभागांनी आपसात समन्वय ठेवावा, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.