कोरोनाचे संकट दूर कर, सर्वांना आरोग्य दे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:19 IST2021-05-15T04:19:10+5:302021-05-15T04:19:10+5:30
गुरुवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने शुक्रवारी सकाळी मुस्लीम बांधवांनी एक महिन्याच्या निर्जळी उपवासाची सांगता करत ईद साजरी केली. कोरोना संसर्गाचा ...

कोरोनाचे संकट दूर कर, सर्वांना आरोग्य दे
गुरुवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने शुक्रवारी सकाळी मुस्लीम बांधवांनी एक महिन्याच्या निर्जळी उपवासाची सांगता करत ईद साजरी केली. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन एकत्र न जमता तसेच एकमेकांना आलिंगन देण्याऐवजी फोनवर संपर्क साधून व संदेश पाठवून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
शहरातील इदगाह मैदानावर यंदा सामूहिक नमाज अदा झाली नाही तसेच मशिदीमध्येही भाविक गेले नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठेही गर्दी न करता घरीच ईद साजरी करावी, असे प्रशासनाने आवाहन केले होते. नगर शहरात मुस्लीम बांधवांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला. महिनाभराच्या निर्जळी उपवासाची सांगता करणारा ईद हा मुस्लीम धर्मामध्ये मोठा सण आहे. ईदच्या दिवशी नगर शहरात मोठे उत्साहपूर्ण वातावरणात असते अनेक ठिकाणी ईद-ए-मिलादचे कार्यक्रम होतात. गेल्या दोन वर्षापासून मात्र कोरोनाच्या सावटामुळे घरी थांबूनच हा सण साजरा करावा लागत आहे.
...........
सोशल मीडियावरून शुभेच्छा संदेश
यंदा रमजान ईद व अक्षय्य तृतीया एकाच दिवशी आले. लॉकडाऊन आणि कोरोना संसर्गामुळे एकमेकांना भेटणे शक्य नसल्याने नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ईद व अक्षय्य तृतीयाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, ईदच्या दिवशी शहरात गजबजणाऱ्या खाऊ गल्ल्या व बाजारपेठांत यंदा शुकशुकाट होता.
...........
घरोघरी दरवळला शीरखुर्माचा सुगंध
ईदनिमित्त यंदा एकत्र स्नेहमिलन, इफ्तार पार्टी व इतर सार्वजनिक कार्यक्रम झाले नसले तरी मुस्लीम बांधवांनी घरी नेहमीप्रमाणे शीरखुर्मा, गुलगुले व इतर पंचपक्वान बनवून उत्साहात ईद साजरी केली. कोरोनाच्या सावटामुळे सलग दुसऱ्या वर्षी मुस्लीम बांधवांनी घरीच थांबून ईद साजरी केली.