नगरकरांचे तोंड गोड करणारी रांजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 11:21 IST2019-03-05T11:20:46+5:302019-03-05T11:21:10+5:30
शेतीला पर्याय म्हणून गाव पशुपालनाकडे वळले. त्यातून दुधाचे मोठे उत्पादन होऊ लागले. त्याच दुधापासून खवा बनवण्याची परंपरा गावात साधारण ७० वर्षांपूर्वी सुरू झाली.

नगरकरांचे तोंड गोड करणारी रांजणी
योगेश गुंड
केडगाव : शेतीला पर्याय म्हणून गाव पशुपालनाकडे वळले. त्यातून दुधाचे मोठे उत्पादन होऊ लागले. त्याच दुधापासून खवा बनवण्याची परंपरा गावात साधारण ७० वर्षांपूर्वी सुरू झाली. तिच परंपरा गावाने टिकवून ठेवल्याने याच खव्याच्या जीवावर सध्या गावाचे अर्थकारण फिरते आहे. या एकट्या गावात महिन्याला १२ हजार किलो खव्याचे उत्पादन होऊन गावात सुमारे २० लाखांचे उत्पन्न येते. घराघरात खवा बनविणाऱ्या भट्ट्या आहेत. तयार झालेला हाच गावरान खवा नगर शहरात विकला जातो. संपूर्ण गावाचा उदरनिर्वाह खव्यावर चालतो.
नगर तालुक्यातील पूर्वेला असणाऱ्या गर्भगिरी डोंगराच्या कुशीत हे गाव रांजणासारखे खोलगट आकाराचे बनले आहे. डोंगरकुशीत शेतीला जास्त वाव नसल्याने येथील लोक पशुपालनाकडे वळले. त्यातून दुधाचे मोठे उत्पादन सुरू झाले. याच दुधापासून खवा तयार करण्याचा व्यवसाय घराघरात सुरू झाला. ७० वर्षांपूर्वी वाहतुकीची साधने नसल्याने खवा विकण्यासाठी येथील लोक तो डोक्यावर घेऊन पायी नगरला विक्रीसाठी येत. नंतर सायकलींचा वापर सुरू झाला. आता वाहतुकीची साधने उपलब्ध झाल्याने रोजचा तयार झालेला ताजा खवा नगर शहरात विक्रीसाठी येतो. रांजणीच्या खव्याला शहरातच नाही तर पुण्या मुंबईला सुद्धा मागणी असल्याने येथील खवा लगेच विकला जातो.
गावात साधारण ८० टक्के कुटुंबे खवा घरीच तयार करतात. गायीच्या दुधापासून तयार झालेला खवा गुलाबजामून बनविण्यासाठी तर म्हशीच्या दुधापासून तयार झालेल्या खव्याचा उपयोग पेढे, बर्फी बनविण्यासाठी केला जातो. खवा बनविण्याची प्रथा प्रत्येक घरात असल्याने सारे गाव याच कामात गुंतले आहे. गावात साधारण ४०० किलो खव्याचे दररोज उत्पादन होते. महिन्याला १२ हजार किलो खवा गावात तयार होतो.
सध्या १६० ते २०० रूपयांपर्यंत भाव आहे. लग्नसराईत हेच दर वाढतात. यातून गावाला महिन्याला साधारण २० लाखांचे उत्पन्न मिळते.
आमच्या आजोबांच्या काळापासून आम्ही घरी खवा तयार करतो. दररोज आम्ही १० ते १५ किलो खव्याचे उत्पादन घेतो. त्यातून रोजचे किमान २ हजार रूपयांचे उत्पन्न मिळते. यासाठी मात्र साºया घराला राबावे लागते.- -ईश्वर जरे, खवा उत्पादक शेतकरी,रांजणी.
नैसर्गिकरीत्या येथे खवा तयार केला जातो. यात कोणीच कसलीही भेसळ करीत नाही. यामुळे येथील खव्याची चव इतर खव्यापेक्षा वेगळी व अस्सल गावरान आहे. सारे गाव खवा तयार करण्याचा व्यवसाय करते. यामुळे गावाचे अर्थकारण खव्यावर अवलंबून आहे.
-बाळासाहेब चेमटे, सरपंच ,रांजणी.
असा तयार होतो खवा
घरात साधी भट्टी तयार करून त्यात लाकडाचा जाळ तयार केला जातो. मोठी कढई भट्टीवर ठेऊन त्यात दूध आटविले जाते. गायीच्या ५ लिटर दुधापासून १ किलो खवा तयार होतो. तर म्हशीच्या ३ लिटर दुधापासून १ किलो खवा तयार होतो. यासाठी घरातील मनुष्यबळ दिवसभर राबत असते. खवा बनविण्यासाठी यंत्र आले असले तरी गावकरी साध्या पारंपरिक पद्धतीनेच खवा तयार करतात.