मंत्र्यांच्या गावात सफाई कर्मचारी असुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:16 IST2021-06-03T04:16:17+5:302021-06-03T04:16:17+5:30
दोन दिवसांपासून राहुरी शहर हद्दीतील नवीपेठ परिसरात असलेल्या भूमिगत गटारीचे साफसफाईचे काम चालू आहे. त्यासाठी खासगी लोकांकडून रोजंदारीवर काम ...

मंत्र्यांच्या गावात सफाई कर्मचारी असुरक्षित
दोन दिवसांपासून राहुरी शहर हद्दीतील नवीपेठ परिसरात असलेल्या भूमिगत गटारीचे साफसफाईचे काम चालू आहे. त्यासाठी खासगी लोकांकडून रोजंदारीवर काम करून घेतले जात आहे. साफ सफाईचे टेंडर घेतलेल्या ठेकेदाराने सफाई कामगारांना आवश्यक साहित्य पुरवणे गरजेचे आहे. मात्र ठेकेदार जास्त फायदा करून घेण्यासाठी कामगारांना कोणतेही साहित्य पुरवत नाहीत. कामगार हे गटारीत उतरून हाताने गटारीतील घाण काढत आहेत. त्यांना बूट, हातमोजे, मास्क असे कोणत्याही प्रकारचे साहित्य मिळत नाही. सध्या लाॅकडाऊन असल्यामुळे मोलमजुरी करणाऱ्या लोकांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत मिळेल ते काम करतात. याचाच गैरफायदा घेऊन काही ठेकेदार या कामगारांच्या जीविताशी खेळत आहेत.
कोरोना महामारीच्या काळात शासन हात स्वच्छ धुवा, मास्क लावा असे कळकळीने सांगत आहे. राहुरी नगरपरिषदेचे काम घेणारे ठेकेदार या गोष्टींकडे दुर्लक्ष करून कामगारांचा जीव धोक्यात घालत आहेत. सध्या साथीच्या आजाराने जगात थैमान घातले आहे. अशावेळी काम करत असताना जर एखाद्या कामगाराच्या जीवावर बेतले तर याला राहुरी नगरपरिषद प्रशासन किंवा संबंधित ठेकेदार यापैकी कोण जबाबदार राहणार असा प्रश्न निर्माण होत आहे. पालिका प्रशासनाने ठेकेदारांवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. मात्र टक्केवारीच्या ठेकेदारीमध्ये तेरी भी चूप मेरी भी चूप असाच प्रकार राहुरी नगरपरिषद प्रशासनाकडून सुरू असल्याची चर्चा आहे.
020621\img-20210601-wa0276.jpg
मंत्र्यांच्या गावात सफाई कर्मचारी असुरक्षित, कोण घेणार कर्मचाऱ्यांची दखल