कर्जतमधून स्वराज्य ध्वज पूजन यात्रेस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:27 IST2021-09-10T04:27:46+5:302021-09-10T04:27:46+5:30
कर्जत : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून व लोकसहभागातून खर्डा (ता. जामखेड) येथील किल्ल्यावर १५ ऑक्टोबरला देशातील सर्वात ...

कर्जतमधून स्वराज्य ध्वज पूजन यात्रेस प्रारंभ
कर्जत : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून व लोकसहभागातून खर्डा (ता. जामखेड) येथील किल्ल्यावर १५ ऑक्टोबरला देशातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज उभारला जाणार आहे. या ध्वजाचे देशातील सहा राज्यांतील ७४ वेगवेगळी संतपीठे, धर्मपीठे येथे पूजन होणार आहे. या ध्वज पूजन यात्रेचा प्रारंभ गुरुवारी सकाळी कर्जत येथील गोदड महाराज मंदिर येथून झाला.
यावेळी आमदार रोहित पवार उपस्थित होते. शिवपट्टण म्हणजेच खर्ड्याच्या भुईकोट किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून या परिसराला नवी ओळख देण्याचा संकल्प पवार यांनी केला आहे. त्यानुसार किल्ल्याच्या आवारात भव्य ध्वजस्तंभ साकार होत असून, त्यावर प्रेरणा, ऊर्जा देणारा ७४ मीटर उंचीचा भगवा स्वराज्य ध्वज फडकविण्यात येणार आहे. भगवा रंग हा कोणा एकाचा नव्हे तर तो सर्वांचा असून, समानतेचा, एकीचा संदेश देणारा आहे. पाली वाङ्मयात अनेक ठिकाणी सर्वगुणसंपन्न गौतम बुद्धांना उद्देशून ‘भगवा’ शब्द आला आहे. सहिष्णुतेची शिकवण देणाऱ्या वारकरी संप्रदायाने खांद्यावर जी पताका घेतली तीही भगव्याचीच छटा असलेल्या काव रंगातली. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ६ जून १६७४ मध्ये झालेल्या राज्याभिषेकाचे स्मरण म्हणून या ध्वजाची उंची ७४ मीटर ठेवण्यात आली आहे. या ध्वजाचा आकार ९६ बाय ६४ फूट असून, वजन ९० किलो आहे. हा देशातील सर्वात उंच भगवा ध्वज असणार आहे, असे पवार यांनी सांगितले.
दसऱ्याच्या मुहूर्तावर १५ ऑक्टोबर रोजी खर्डा येथील किल्ल्यावर या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होणार आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रासह देशातील प्रमुख संतपीठे, शौर्यपीठे आणि धार्मिक पीठे तसेच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा, बोधगया (बिहार), केदारनाथ (उत्तराखंड), आग्रा किल्ला (उत्तर प्रदेश), अजमेर शरीफ दर्गा (राजस्थान), महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे), बडोदा संस्थानचे अधिपती, गुजरात अशा ७४ ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होणार आहे. त्यासाठी सहा राज्यांमधून बारा हजार किलोमीटर असा सलग ३७ दिवस या ध्वजाचा प्रवास होईल.
---
०९ कर्जत पवार
कर्जतचे ग्रामदैवत संत गोदड महाराज मंदिर येथे स्वराज्य ध्वजाचे पूजन करताना आमदार रोहित पवार.