नगरसेवकांच्या निलंबनाला स्थगिती
By Admin | Updated: December 16, 2015 23:07 IST2015-12-16T22:35:02+5:302015-12-16T23:07:50+5:30
अहमदनगर : पक्षादेश डावलून महापौरपदाच्या निवडणुकीत मतदान केल्यामुळे निलंबित केलेल्या मनसेच्या तीन नगरसेवकांचे निलंबन स्थगित करण्यात आले

नगरसेवकांच्या निलंबनाला स्थगिती
अहमदनगर : पक्षादेश डावलून महापौरपदाच्या निवडणुकीत मतदान केल्यामुळे निलंबित केलेल्या मनसेच्या तीन नगरसेवकांचे निलंबन स्थगित करण्यात आले असून शहर कार्यकारिणी तडकाफडकी बरखास्तीचा निर्णय पक्षाचे नेते शिरीष सावंत यांनी घेतला. तसे लेखी आदेशही त्यांनी दिले. किशोर डागवाले यांनी मनसेतून सेनेत प्रवेश करताच पक्षाने तिघांचे निलंबन स्थगीत करून त्यांची मनधरणी केली. याशिवाय शहर प्रमुखपदाची जबाबदारी नगरसेवक गणेश भोसले यांच्यावर टाकण्याचा निर्णय झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
महापौर पदाच्या निवडणुकीत सेनेचे उमेदवार सचिन जाधव यांना मतदान करण्याचा पक्षादेश मनसेच्या प्रदेशनेत्यांनी बजावला होता. मात्र हा पक्षादेश डावलून पक्षाच्या किशोर डागवाले, गणेश भोसले, वीणा बोज्जा, सुवर्णा जाधव यांनी आघाडीचे अभिषेक कळमकर यांना मतदान केले. कळमकर महापौर पदाच्या निवडणुकीत विजयी झाले. मात्र पक्षादेश डावलला म्हणून पक्षाने चारही नगरसेवकांना सहा वर्षासाठी निलंबित केले होते.
किशोर डागवाले यांनी गत आठवड्यात मनसेतून सेनेत प्रवेश केला. त्यानंतर अन्य तिघेही सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. पक्षाचे मुंबईतील नेते अविनाश अभ्यंकर यांनी तिन्ही नगरसेवकांशी संपर्क साधून त्यांची बुधवारी पुणे येथे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी भेट घडवून आणली. स्थायी समितीचे सभापती गणेश भोसले, नगरसेविका वीणा बोज्जा यांचे पती श्रीनिवास बोज्जा, नगरसेविका सुवर्णा जाधव यांचे पती दत्ता जाधव, नगरसेवक कैलास गिरवले, गजेंद्र राशीनकर, सानप यांनी राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला. नगर शहरातील पक्षाची स्थिती त्यांनी ठाकरे यांच्यासमोर मांडली. त्यानंतर ठाकरे यांच्या आदेशान्वये शहर कार्यकारिणी बरखास्त करत तिघा नगरसेवकांचे निलंबन स्थगीत करण्यात आले.
शहरप्रमुख पदाची जबाबदारी गणेश भोसले यांच्यावर सोपविण्यात येणार असून त्यांच्याशी चर्चा करूनच नवीन शहर कार्यकारिणी जाहीर केली जाईल, असाही निर्णय झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पुढील दोन वर्षात पक्ष संघटना बळकट करण्याची जबाबदारी भोसले यांच्यावर टाकण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)