आणखी सात कर्मचाऱ्यांचे निलंबन
By Admin | Updated: September 7, 2016 00:36 IST2016-09-07T00:26:27+5:302016-09-07T00:36:23+5:30
अहमदनगर : आंतरजिल्हा आपसी बदलीने जिल्ह्यात बदलून आलेल्या आणि नेमणुकीच्या ठिकाणात अंशत: बदलाची मागणी करणाऱ्या १४ प्राथमिक शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

आणखी सात कर्मचाऱ्यांचे निलंबन
अहमदनगर : आंतरजिल्हा आपसी बदलीने जिल्ह्यात बदलून आलेल्या आणि नेमणुकीच्या ठिकाणात अंशत: बदलाची मागणी करणाऱ्या १४ प्राथमिक शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. विशेष म्हणजे १४ शिक्षक निलंबित करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश असतांना प्राथमिक शिक्षण विभाागाने १३ शिक्षकांची माहिती माध्यमांना दिली. मंगळवारी शिल्लक राहिलेल्या तिघा शिक्षकांना निलंबनाचे आदेश बजावण्याच्या सूचना बिनवडे यांनी दिल्या आहेत. दरम्यान, आणखीन सात जि.प. कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यात ६ प्राथमिक शिक्षक आणि १ वरिष्ठ साहाय्यकाचा समावेश आहे.
जिल्ह्यात जून महिन्यांत आंतरजिल्हा आपसी बदलीने बदलून आलेल्या ४० शिक्षकांपैकी १७ शिक्षक नेमणुकीच्या ठिकाणी हजर झालेले नव्हते. आंतरजिल्हा आपसी बदलीत जी शाळा बदलीच्या अर्जात सुचवलेली आहे. त्या ठिकाणी संबंधित शिक्षकाला हजर व्हावे लागते. मात्र, निलंबनाचे आदेश निघालेल्या या शिक्षकांनी मूळ बदलीच्या ठिकाणी हजर न होता. अंशत: बदलीसाठी प्रयत्न करत होते. यामुळे दोन महिन्यांपासून या १४ शिक्षकांच्या शाळेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. यामुळे बिनवडे यांनी आंतरजिल्हा आपसी बदलीने हजर न झाल्याने शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
निलंबनाची कारवाई झाली असल्याची कुणकुण ३ शिक्षकांना मिळताच त्यांनी शिक्षण विभागाला फोनवरून हजर होत असल्याची कल्पना दिली. प्रत्यक्षात संबंधित शिक्षकांचे निलंबनाचे आदेश निघाल्यानंतर हे शिक्षक मुळ शाळेवर हजर झाले आहेत. ही बाब मंगळवारी बिनवडे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी शिक्षण विभागाला तत्काळ संबंधित या शिक्षकांना निलंबनाचे आदेश बजावण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, आणखीन सात कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
राहाता तालुक्यातील एका शिक्षिकेच्या पतीने पत्नीच्या नाजुक कारणातून मे महिन्यांत आत्महत्या केली होती. मयत शिक्षकांच्या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी केलेल्या तपासात मयताची पत्नी तथा जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका आणि दोन सहकारी प्राथमिक शिक्षकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. यात या तिन्ही शिक्षकांना तीन दिवस पोलीस कोठडी मिळाली होती. राहात्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी या प्रकरणी कोणताच अहवाल जिल्हा परिषदेला सादर केलेला नव्हता. मात्र, मयताच्या भावाने बिनवडे यांच्याकडे तक्रार करत पोलीस तपास, संबंधित शिक्षकांच्या पोलीस कोठीडीची कागदपत्रे सादर केली. त्यानुसार तीन शिक्षकांवर कारवाई होणार आहे. शिक्षण विभागाने निलंबनाची फाईल तयार केली आहे.
(प्रतिनिधी)
आंतरजिल्हा आपसी बदलीने मूळ शाळेत हजर न होणाऱ्या शिक्षकांची संख्या १४ होती. ती ३ ने वाढत आता १७ झाली आहे. मूळ शाळेवर हजर न झालेल्या रुपेश वाणी, लता परदेशी, दिपस्वी पवार (जामखेड) अशी या शिक्षकांची नावे आहेत. या शिक्षकांना निलंबित करण्यात येणार आहे. यासह मुख्यालयातील कृषी विभागात विना परवानगी गैरहजर राहणाऱ्या किरण पागिरे यांनाही निलंबित करण्यात येणार आहे. निलंबित झालेल्या या १७ शिक्षकांची विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याचे बिनवडे यांनी सांगितले.