ससाणेंच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायम
By Admin | Updated: December 17, 2015 23:37 IST2015-12-17T23:27:04+5:302015-12-17T23:37:01+5:30
अहमदनगर : विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसमध्ये बिघाडी झालेली असतांना नागपुरातील काँग्रेसच्या बैठकीत तोडगा निघत नसल्याने चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे.

ससाणेंच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायम
अहमदनगर : विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसमध्ये बिघाडी झालेली असतांना नागपुरातील काँग्रेसच्या बैठकीत तोडगा निघत नसल्याने चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. मुंबईच्या जागेवर तोडगा निघाला तर नगरचा विषय मार्गी लागेल असा कयास व्यक्त करण्यात येत असून स्थानिक पातळीवर आघाडीच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार जयंत ससाणे यांच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी १२ डिसेंबरला उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवसापासून ससाणे यांच्या उमेदवारीबाबत घोळ सुरू आहे. आधी हा विषय मुंबईत, त्यानंतर नागपूर आणि दिल्लीपर्यंत पोहचला आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार ससाणे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला होता. आता उमेदवारीबाबत काँग्रेसच्या गोटातून कोणतीच अधिकृत भूमिका जाहीर होत नसल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमधील गोंधळ वाढला आहे.
नगरची जागा काँग्रेसची असतांनाही ही जागा राष्ट्रवादीला दिलीच कशी. काँग्रेसकडे नगरची जागा असती, तर वादच निर्माण झाला नसता, अशी कुजबुज काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. या शिवाय मुंबईचा विषय मार्गी लागला तरी नगरमध्ये ऐनवेळी राष्ट्रवादीला कसा पाठींबा द्यावा, असा प्रश्नही दबक्या आवाजात विचारला जात आहे.
(प्रतिनिधी)