जिल्हा बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती, सहकार विभाग करणार चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:32 IST2017-10-31T00:32:22+5:302017-10-31T00:32:39+5:30
मुलगा परीक्षार्थी असतानाही एमडी निवड मंडळावर असल्याच्या ‘लोकमत’च्या वृत्ताची सहकार विभागाने गंभीर दखल घेतली असून, जिल्हा सहकारी बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती दिली आहे.

जिल्हा बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती, सहकार विभाग करणार चौकशी
- सुधीर लंके
अहमदनगर : मुलगा परीक्षार्थी असतानाही एमडी निवड मंडळावर असल्याच्या ‘लोकमत’च्या वृत्ताची सहकार विभागाने गंभीर दखल घेतली असून, जिल्हा सहकारी बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती दिली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी (एमडी) रावसाहेब वर्पे हे भरतीच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असताना त्यांचा मुलगाच परीक्षार्थी असल्याची बाब ‘लोकमत’ने निदर्शनास आणली. सहकार विभागाचे प्रधान सचिव एस. एस. संधु व सहकार आयुक्त विजयकुमार झाडे यांनी त्याची दखल घेत चौकशीचा आदेश दिला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांसह संघटनांच्या तक्रारींचीही चौकशी केली जाणार आहे. नाशिकचे विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी सोमवारी हा स्थगिती आदेश काढला. लिपिक, ज्युनिअर आॅफिसर, अधिकारी पदांच्या ४६४ जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरू आहे. ‘नायबर’ संस्थेमार्फत लेखी परीक्षा घेण्यात आली. भरतीची अंतरिम यादीही बँकेने शनिवारी प्रसिद्ध केली. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर उमेदवारांना उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी देण्याचा बँकेने निर्णय घेतला.
स्थगिती आदेशात ‘लोकमत’चा संदर्भ
नाशिकचे विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी काढलेल्या स्थगिती आदेशात ‘मुलगा परीक्षार्थी असतानाही एमडी निवड मंडळावर’ या ‘लोकमत’च्या वृत्ताचा संदर्भ देण्यात आला आहे. या बातमीतील तपशील आदेशात नमूद करण्यात आला आहे.