श्रीगोंद्यातील दहा रेशन दुकानांचे परवाने निलंबित : पॉस मशिनचा वापर न करणे भोवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 18:56 IST2018-04-26T18:56:38+5:302018-04-26T18:56:44+5:30
तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य वाटप करण्यासाठी पॉस मशिनचा वापर न केल्याप्रकरणी तालुक्यातील दहा स्वस्त धान्य दुकानदारांना नोटिसा बजावल्यानंतर दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

श्रीगोंद्यातील दहा रेशन दुकानांचे परवाने निलंबित : पॉस मशिनचा वापर न करणे भोवले
श्रीगोंदा : तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य वाटप करण्यासाठी पॉस मशिनचा वापर न केल्याप्रकरणी तालुक्यातील दहा स्वस्त धान्य दुकानदारांना नोटिसा बजावल्यानंतर दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
तहसीलदार महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करण्यात आली. यामध्ये धान्य वाटप करण्यासाठी पॉस मशिनचा वापर सक्तीचा केला असताना माठ, येळपणे, महादेववाडी, भावडी, अरणगाव, कोसेगव्हाण, हिरडगाव, वांगदरी, श्रीगोंदा व कौठा येथील स्वस्त धान्य दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे.
तालुक्यात सुमारे २०० परवाना धारक स्वस्त धान्य दुकानदार आहेत. सरकारने दुकानातील धान्य व रॉकेलचा काळाबाजार रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार स्वस्त धान्य दुकानांचा चेहरा बदलण्यात आला, पण काही दुकानदार अजूनही जुन्या पध्दतीने काम करीत आहेत. तहसीलदार महाजन यांनी अनेक दुकानांची झाडाझडती सुरू केली आहे. त्यातून वरील दहा दुकानांमधील सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे. यात काही सहकारी संस्था व काही व्यक्तिगत दुकान परवाने आहेत. तहसीलदारांच्या कारवाईने काही सहकारी संस्था गटांच्या दुकानांना चाप बसणार आहे.