जिल्हा बँकेसाठी कर्जत-जामखेडमध्ये सर्जिकल स्ट्रा‌इक केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:40 IST2021-02-28T04:40:27+5:302021-02-28T04:40:27+5:30

जामखेड : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपचा विजय सर्जिकल स्ट्राइक आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा ...

Surgical strike in Karjat-Jamkhed for District Bank | जिल्हा बँकेसाठी कर्जत-जामखेडमध्ये सर्जिकल स्ट्रा‌इक केला

जिल्हा बँकेसाठी कर्जत-जामखेडमध्ये सर्जिकल स्ट्रा‌इक केला

जामखेड : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपचा विजय सर्जिकल स्ट्राइक आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा दीड वर्षांनी निघाला. दीड वर्षात मतदारसंघात दीड रुपयांचे कामही केले नाही, अशी टीका माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर केली.

नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर

भाजप कार्यकर्त्यांची शनिवारी जामखेड शहरात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, कर्जत-जामखेड नगर परिषद निवडणूक प्रभारी अभय आगरकर, भाजप तालुकाध्यक्ष अजय काशिद, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे, युवक अध्यक्ष शरद कार्ले, रवींद्र अनासपुरे, उपसभापती मनीषा सुरवसे, महिला आघाडीच्या अध्यक्षा कविता जगदाळे, जिल्हा बँक संचालक अमोल राळेभात आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांना त्रास देत आहे. वीजजोड तोडले जात आहेत. भाजपने पाच वर्षांत एकाही शेतकऱ्याचे वीजजोड तोडले नव्हते. माझ्याकडे आलेल्या नगरसेवकांना सन्मानाची वागणूक दिली. त्यांना विमानातून फिरविले. विद्यमान आमदार त्यांना त्यांच्या गाडीतही बसवत नाहीत.

कर्जतकर म्हणाले, नगर जिल्ह्यात भाजपचे खाते उघडणारा जामखेड हा पहिला तालुका आहे. पहिला जिल्हा परिषद सदस्य, पहिला आमदार याच तालुक्याने दिला. पवारांना चकमा देणाराही कर्जत-जामखेड हाच मतदारसंघच असेल. शेतकरी आंदोलनाविषयी रोहित पवार यांना विचारावे ते काहीही सांगू शकणार नाहीत, अशी टीका त्यांनी केली. सुधीर राळेभात, अर्चना राळेभात, मनोज कुलकर्णी, लहू शिंदे, अभयराजे राळेभात आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक तालुकाध्यक्ष अजय काशिद यांनी केले. महिला आघाडीच्या अध्यक्षा कविता जगदाळे यांनी आभार मानले.

----

महादेव मला माफ करा...

रोहित पवार यांनी विंचरणा नदीच्या पात्रात शंकराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. त्यासाठी गृह, पर्यावरण विभाग, हरित लवाद यांची परवानगी घेतली नाही. टाऊन प्लॅनिंग नाही. पूर नियंत्रण रेषेचा भंग केला आहे. याविरोधात मी लढणार आहे. त्यामुळे महादेव मला माफ करा, असे प्रा. शिंदे यांनी म्हणाले.

Web Title: Surgical strike in Karjat-Jamkhed for District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.