अहमदनगर : खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येत असलेले ‘सुप्रिय स्वाधार अभियान’ नगर शहरातील गरजूंपर्यंत पोहोचविणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे यांनी सांगितले.
गेल्या दीड-दोन वर्षांपासून कोरोनाचे महाभयंकर संकट ओढवले आहे. कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा कोविड काळात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या काळात दुर्दैवी मृत्यू पावणाऱ्या पतीच्या पत्नीला संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळवून दिला जाईल. संजय गांधी निराधार योजनेसाठी पतीचा मृत्यू दाखला, तलाठ्याचा रहिवासी दाखला, तहसीलदाराचा २१ हजारांचे उत्पन्न असलेला दाखला, वयाचा दाखला, रेशन कार्ड, मुलांच्या वयाचे दाखले, पासपोर्ट फोटो, प्रतिज्ञापत्र, मतदार यादीतील नाव असलेली छायांकित प्रत, दारिद्र्य यादीत नाव असलेला मनपाचा दाखला, आदी सर्व कागदपत्रे या योजनेसाठी लागणार आहेत. तसेच श्रावण बाळ योजना मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे (६५ पेक्षा जास्त वय) असणाऱ्यांसाठी तलाठ्याचा रहिवासी दाखला, तहसीलदाराचा २१ हजारांचे उत्पन्न असलेला दाखला, वयाचा दाखला, रेशन कार्ड, मुलांच्या वयाचे दाखले, पासपोर्ट साईज फोटो, दारिद्र्य यादीत असलेल्याचा मनपाचा दाखला, मतदार यादीतील नाव असलेली छायांकित प्रत, आधार कार्डाची छायांकित प्रत आदी सर्व कागदपत्रे या योजनेसाठी लागणार असल्याचे आठरे यांनी सांगितले.