अतिक्रमण हटाव मोहिमेला जिल्हाधिकाऱ्यांचे पाठबळ
By Admin | Updated: July 10, 2014 00:32 IST2014-07-09T23:31:05+5:302014-07-10T00:32:07+5:30
अहमदनगर: महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला जिल्हाधिकाऱ्यांचे पाठबळ लाभले आहे. त्यामुळे ही मोहीम आखलेल्या नियोजनानुसार राबविली जाणार आहे.

अतिक्रमण हटाव मोहिमेला जिल्हाधिकाऱ्यांचे पाठबळ
अहमदनगर: महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला जिल्हाधिकाऱ्यांचे पाठबळ लाभले आहे. त्यामुळे ही मोहीम आखलेल्या नियोजनानुसार राबविली जाणार आहे. मोहिमेसाठी आवश्यक पोलीस बळ उपलब्ध करून देण्याची सूचना जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांना केली.
शहरातील वाढते अपघात रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील अतिक्रमणे काढून रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेने पुढाकार घेत १० दिवसांचे नियोजन करून मंगळवारी कारवाईस प्रत्यक्षात सुरूवात केली. मात्र आमदार अनिल राठोड यांच्या विरोधाने मोहीम दुपारनंतर थांबली. अतिक्रमणधारकांना नोटीस द्या, मगच कारवाई करा असे राठोड यांचे म्हणणे होते. तर अतिक्रमणधारकांना नोटीस देण्याची तरतूदच कायद्यात नाही असे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे.
मोहिमेला आमदारांनी विरोध केल्याची बाब महापालिकेचे प्रभारी आयुक्त भालचंद्र बेहेरे यांनी जिल्हाधिकारी कवडे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी पोलीस अधीक्षक शिंदे हेही तेथे उपस्थित होते. अतिक्रमण हटाव मोहीम सुरू ठेवावी, ती बंद करू नये. अतिक्रमणधारकांना थारा देता कामा नये. अतिक्रमण हटावसाठी आवश्यक तेवढा पोलिसांचा फौजफाटा उपलब्ध करून देण्याची सूचना कवडे यांनी केली. पोलीस अधीक्षक शिंदे यांनी पोलीस बंदोबस्त देण्याची तयारी दर्शविली.
या चर्चेनंतर महापालिकेने सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहीम गुरूवारी सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणी विरोध केला तर पोलीस कायदेशीर कारवाई करतील अशी भूमिका मनपा प्रशासनाने घेतली आहे.
(प्रतिनिधी)