सुपा पोलिसांना १७ दिवसानंतरही तपासात अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:19 IST2021-04-12T04:19:38+5:302021-04-12T04:19:38+5:30
पारनेर : तालुक्यातील नारायणगव्हाण येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेचे एटीएम फोडून चोरट्यांनी १८ लाख रुपये लंपास केले होते. या ...

सुपा पोलिसांना १७ दिवसानंतरही तपासात अपयश
पारनेर : तालुक्यातील नारायणगव्हाण येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेचे एटीएम फोडून चोरट्यांनी १८ लाख रुपये लंपास केले होते. या चोरी प्रकरणाचा तपास लावण्यात १७ दिवसानंतरही सुपा पोलिसांना यश आले नाही.
नगर-पुणे महामार्गावर बँक ऑफ महाराष्ट्रची पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथे शाखा आहे. २३ मार्च रोजी रात्री एक ते दोनच्या सुमारास तीन जणांनी बँकेचे एटीएम तोडून मशीनसह १८ लाखांची रक्कम पळवून नेली होती. विशेष म्हणजे, दुसऱ्या दिवशी पोलिसांना राळेगणसिद्धी रस्त्यावर एटीएम मशीन सापडले होते. तब्बल सतरा दिवस उलटूनही पोलिसांना अद्याप या चोरी प्रकरणी कोणतेही धागेदोरे हाती लागले नसल्याने पोलिसांच्या तपासाबाबत संशय व्यक्त होत आहे.
--
बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीमच लक्ष्य..
नारायणगव्हाण येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम यापूर्वी दोनवेळा दरोडेखोरांनी फोडून रक्कम लंपास केली आहे. मात्र, या गुन्ह्याचा तपासही झाला नसल्याने दरोडेखोरांनी थेट एटीएम उचलून नेऊन पुन्हा १८ लाखांची चोरी केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
---
नारायणगव्हाण येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेचे एटीएम व रोकड पळविल्याप्रकरणी अद्याप कुणालाही ताब्यात घेतले नाही. ठसेतज्ज्ञांकडे ठसे पाठविले आहेत. रेकॉर्डवरील आरोपींची चौकशी करण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडूनही तपास सुरू आहे.
-नितीन गोकावे,
पोलीस निरीक्षक, सुपा