पाणी चोरीसाठी सुपा एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:27 IST2021-02-26T04:27:53+5:302021-02-26T04:27:53+5:30

सुपा : पाणी चोरून ते टँकरद्वारे विकणाऱ्यांनी पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीसाठी साठवण टाकीत पाणी घेऊन जाणारी मुख्य जलवाहिनी फोडली. ...

Supa broke MIDC's main aqueduct for water theft | पाणी चोरीसाठी सुपा एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी फोडली

पाणी चोरीसाठी सुपा एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी फोडली

सुपा : पाणी चोरून ते टँकरद्वारे विकणाऱ्यांनी पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीसाठी साठवण टाकीत पाणी घेऊन जाणारी मुख्य जलवाहिनी फोडली. त्यातून पाणी चोरीचा प्रयत्न असफल झाला. मुख्य जलवाहिनी फोडल्याने त्यातून हजारो लिटर पाणी वाया गेले. तसेच कारखान्यांना जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात व्यत्यय आला. त्यामुळे एमआयडीसीचे अधिकारी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत.

बुधवारी (दि. २४) रात्री नगर-पुणे रस्त्यावरील वाघुंडे गावाजवळील दत्त मंदिर परिसरात जलवाहिनी फोडण्यात आली. सध्या सुपा एमआयडीसी जुनी व विस्तारित अशा दोन्ही ठिकाणी असणाऱ्या साठवण टाकीत थेट मुळा जलाशयातून जलवाहिनीद्वारे पाणी आणून कारखान्यांना पुरविले जाते. परंतु, ही पाणी योजना खूपच जुनी झाल्याने अनेकवेळा तिच्यात बिघाड होतो. जलवाहिनी पाण्याच्या दाबाने फुटण्याच्या वाढत्या प्रकाराने अनेक वेळा पाणी पुरवठ्यात व्यत्यय येत असल्याने अनेक कारखाने टँकरने पाणी विकत घेतात. काही ठिकाणी पिण्यासाठी, वापरासाठी, फळबागा व शेतातील पिकासाठी, इमारत बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज भासते. अशा लोकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे टँकर व्यावसायिक या भागात पाण्यावर बक्कळ पैसे कमावतात.

एमआयडीसीच्या जलवाहिनीतून पाण्याचे कनेक्शन घेऊन त्याद्वारे फुकटचे पाणी घेऊन ते विकण्याचा काहींचा डाव असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनीच हा उद्योग केला असावा अशी चर्चा आहे. साधारणपणे पाऊण इंची छेद घेतल्याने त्यातून प्रचंड वेगाने पाणी बाहेर येऊ लागले. त्यामुळे त्यात कनेक्शन बसविणे अवघड गेल्याने ही टोळी घाबरली व त्यांनी तेथून पोबारा केला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. काही नागरिकांनी ही बाब एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना कळविली. गुरुवारी त्यांनी त्याची तातडीने दुरुस्ती करून गळती थांबविली.

------

एमआयडीसीतील कारखान्यासाठी लागणारा पाणीपुरवठा नियमित व सुरळीत ठेवण्यासाठी आमचे युनिट रात्रंदिवस काम करते. आता पाणी चोरांची ही नव्याने टोळी सक्रिय झाल्याने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जाईल. त्यासाठी येथे पाईपलाईन फोडणाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणार आहोत.

-सरदार आनुसे,

सहाय्यक अभियंता, एमआयडीसी

---

२५ सुपा पाणी

सुपा एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फोडल्याने वाया गेलेले पाणी. कापड गुंडाळून तेथे दगड लावून पाणी थांबविण्याचा केलेला प्रयत्न.

Web Title: Supa broke MIDC's main aqueduct for water theft