श्रीगोंद्याच्या नगराध्यक्षपदी सुनीता शिंदे
By Admin | Updated: June 10, 2016 23:36 IST2016-06-10T23:26:33+5:302016-06-10T23:36:59+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंदाच्या नगराध्यक्षपदाची लढाई भाजपाच्या सुनीता शिंदे यांनी दोन मतांनी जिंकली. नागवडे गटाच्या तीन तर आमदार राहुल जगताप गटाच्या एक नगरसेविका गैरहजर राहिल्या.

श्रीगोंद्याच्या नगराध्यक्षपदी सुनीता शिंदे
श्रीगोंदा : श्रीगोंदाच्या नगराध्यक्षपदाची लढाई भाजपाच्या सुनीता शिंदे यांनी दोन मतांनी जिंकली. नागवडे गटाच्या तीन तर आमदार राहुल जगताप गटाच्या एक नगरसेविका गैरहजर राहिल्या. राजेंद्र नागवडे यांनी शब्द पाळल्याने पाचपुते गटाचे पालिकेवर वर्चस्व कायम राहिले. निवडीनंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. तर आ. जगताप यांच्या गोटात सन्नाटा होता.
निवडणूक निर्णय अधिकारी संतोष भोर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीस १८ पैकी १४ नगरसेवक हजर होते. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या सुनीता शिंदे यांना ८ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीना शेंडगे यांना ६ मिळाली. त्यामुळे सुनीता शिंदे विजयी झाल्याचे अधिकृत जाहीर करण्यात आले.
नागवडे गटाच्या गयाबाई सुपेकर, वैशाली आळेकर, कुसुम दांडेकर, आ. जगताप गटाच्या अर्चना गोरे या नगरसेविका व्हीपच्या फतव्यामुळे गैरहजर राहिल्या. निवडणुकीनंतर संत शेख महंमद महाराज मंदिरात विजयी सभा झाली. सभेत माजी मंत्री बबनराव पाचपुते, बाबासाहेब भोस, बाळासाहेब महाडिक, मनोहर पोटे, पोपटराव खेतमाळीस यांची भाषणे झाली. यावेळी नगरसेवकांचे समर्थक मोठ्या संख्येने हजर होते.
सुनीता शिंदे यांना मागील महिन्यात भाजपा महिला आघाडीचे तालुकाध्यक्ष पद मिळाले आणि महिनाभरातच त्यांना नगराध्यक्षापदाची लॉटरी लागली आहे.
(तालुका प्रतिनिधी)
माजी मंत्री बबनराव पाचपुते, बाबासाहेब भोस यांनी नगराध्यक्ष करण्याचा शब्द दिला होता. काँग्रेस नेते राजेंद्र नागवडे यांचीही मोठी मदत मिळाली. माजी नगराध्यक्षा छाया गोरे व नगरसेवकांनी यशावर शिक्कामोर्तब केले. नगराध्यक्षपद भूषविण्यासाठी वेळ कमी असला तरी विकासाचे लक्ष्य गाठणार आहे.
-सुनीता शिंदे, नगराध्यक्षा
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी आपण काँग्रेसच्या नगरसेवकांना मोकळीक दिली होती. कुणावर दबाव आणला नाही. भविष्यात आघाडी कायम राहणार आहे.
-राजेंद्र नागवडे.
अध्यक्ष, नागवडे साखर कारखाना
पालिकेतील समीकरणावर मी बोलणार नाही. माझी ‘थांबा आणि पहा’ एवढीच भूमिका राहणार आहे.
-राहुल जगताप, आमदार
विरोधी मित्रांनी दिलेला शब्द पाळला आहे, परंतु त्यांना उघड करू नका. भविष्यात आपणास शब्द पाळणारांना मदत करून परत फेड करावी लागेल.
- बबनराव पाचपुते, माजी मंत्री
नागवडेंचा शब्द अन् झटका
विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव नागवडे यांनी शरद पवार यांना शब्द दिला व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना पराभवाचा झटका बसला. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजेंद्र नागवडे यांनी पाचपुते यांना सहकार्याचा शब्द दिला आणि आ. जगताप गटाला झटका बसला. नागवडे यांच्या भूमिकेमुळे पाचपुते व नागवडे यांनी तडजोडीचे राजकारण केले. अशीच तडजोड करून ‘रासपा’चे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांना ‘लक्ष्य’ करणार असल्याची राजकीय वतुर्ळात चर्चा आहे.