सुनंदा पवार यांनी ‘त्या’ आजीला मिळवून दिला ‘माहेर’ संस्थेचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:25 IST2021-08-22T04:25:43+5:302021-08-22T04:25:43+5:30
कर्जत : मुलांचे संगोपन-शिक्षण, संसाराचा गाडा ओढत आयुष्यभर राबणारी घरातील माउली जेव्हा वृद्धापकाळाने एका जागी स्थिरावते तेव्हा तिला गरज ...

सुनंदा पवार यांनी ‘त्या’ आजीला मिळवून दिला ‘माहेर’ संस्थेचा आधार
कर्जत : मुलांचे संगोपन-शिक्षण, संसाराचा गाडा ओढत आयुष्यभर राबणारी घरातील माउली जेव्हा वृद्धापकाळाने एका जागी स्थिरावते तेव्हा तिला गरज असते ती आधाराची. मात्र रक्ताची नाती स्वार्थ आणि फायद्यापुढे कायमची गोठून जातात आणि आधाराविना ती माउली कुढत जगाचा निरोप घेते. मात्र अशा ज्येष्ठ नागरिकांना मायेची सावली मिळाली तर याहून वेगळे सुख काय असावे? भांबोरा (ता. कर्जत) येथील एका वृद्ध आजीला आधार मिळवून देत आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान तर केलाच. मात्र समाजातील अशा निष्ठुर, बेजबाबदार प्रवृत्तीला कडाडून विरोधही केला आहे.
भांबोरा येथील मंदिरात एका वयोवृद्ध आजींना त्यांच्या नातेवाइकांनी सोडले अन् या आजींना आधाराची खूप गरज आहे, अशा आशयाचा फोन कॉल तेथील महिला सरपंच माधुरी लोंढे यांनी सुनंदा पवार यांना केला. जेवणाअभावी शरीरात त्राण न राहिलेल्या या आजींना उभेही राहणे शक्य होत नव्हते. वेळ न दवडता आजींना दवाखान्यात दाखल करण्यात आले. सलाइन, औषधोपचार देण्यात आले आणि हलक्या आहाराने आजी सावरल्या. त्यांना उठता-बसताही येऊ लागले. आजींची पुन्हा फरपट होऊ नये, यासाठी सुनंदा पवार यांनी पुणे येथील ‘माहेर’ या एकट्या व नातेवाइकांनी सोडून दिलेल्या नागरिकांना आधार देणाऱ्या व त्यांच्या हातांना काम देणाऱ्या संस्थेशी संपर्क साधला. या संस्थेनेही आजींसाठी माहेरचे दार खुले केले. सुरक्षित वातावरणात आज आजी तेथे राहत आहेत.