राजूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पअंतर्गत येणाऱ्या शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, केळीकोतुळ येथील विद्यार्थिनी असलेल्या सुजाता वायळ यांनी वडिलांच्या निधनानंतर प्रतिकूल परिस्थितीमध्ये सर्व कुटुंबाची जबाबदारी पेलत एमपीएससी परीक्षेत यश मिळवून नायब तहसीलदार पद मिळविले आहे. वडील आश्रमशाळेत कामाठी होते. त्यांच्या अकाली निधनानंतर आईने स्वयंपाकी म्हणून सेवा सुरू केली. सुजाताला आश्रमशाळेत शिक्षण देऊन पोलीस अधिकारी बनविले. तेवढ्यावरच समाधानी न राहता सुजाताने नंतरच्या प्रयत्नात नायब तहसीलदार पद प्राप्त केले आहे. प्रतिकूल परिस्थितीत सुजाताने मिळविलेले यश हे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या आदिवासी मुलींसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
.............
माझी निवड नायब तहसीलदार म्हणून झाली. पहिली ते बारावी पर्यंतचे सर्व शिक्षण केळीकोतुळ आश्रमशाळेत झाले आहे. माझी सर्वांगीण जडणघडण आणि शैक्षणिक प्रगतीमध्ये आश्रमशाळेचा व तेथील शिक्षकांचा विशेष सहभाग आहे. आश्रमशाळा कुटुंबातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये ती क्षमता आहे. आपले आई-वडील आणि शाळेचे नाव मोठे करू शकतात.
- सुजाता पंढरीनाथ वायळ