कोविड काळात वाढल्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST2021-06-24T04:15:40+5:302021-06-24T04:15:40+5:30

श्रीरामपूर : कोविडच्या दुसऱ्या लाटेत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे तरुणांचा रोजगार नष्ट झाला. त्यामुळे येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच ...

Suicides increased during the Kovid period | कोविड काळात वाढल्या आत्महत्या

कोविड काळात वाढल्या आत्महत्या

श्रीरामपूर : कोविडच्या दुसऱ्या लाटेत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे तरुणांचा रोजगार नष्ट झाला. त्यामुळे येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच महिन्यात तीन तरुणांच्या आत्महत्येचे प्रकार समोर आले.

श्रीरामपूर शहर व तालुक्याच्या हद्दीमध्ये तीन तरुणांनी आत्महत्या केल्या. यात गोंधव‌णी येथील परिसरातील राजेंद्र रावसाहेब शेळके (वय ३९) या तरुणाचा समावेश होता. बांधकाम क्षेत्रात मजुरीचे तो काम करत होता. मात्र, लॉकडाऊनमध्ये हा व्यवसाय विस्कळीत झाल्याने रोजगार मंदावला. त्यातून शेळके याने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविले. दुसरी घटना बेलापूर येथे घडली. प्रवरा नदीपात्रात शंकर उत्तम गलांडे (वय ३१) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. पढेगाव येथील शंकर हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होता. आत्महत्येपूर्वी नदीच्या पुलावर त्याने मोटारसायकल लावलेली होती. मोटारसायकलवर असलेल्या पिशवीत त्याचे ओळखपत्र व कुटुंबीयांचे मोबाईल नंबर असलेली चिठ्ठी मिळून आली. त्यावरून शंकर याची ओळख पटली.

तिसऱ्या घटनेत पढेगाव रेल्वे स्थानकाजवळ नेवासे येथील भारत मोहन बर्डे (वय ४०) यांचा मृतदेह सापडला. तो मजुरीचे काम करत होता. त्यानेही लॉकडाऊनमुळे आत्महत्या केली.

कोविड संकटामुळे तरुणांच्या मानसिक स्वास्थ्यावर वाईट परिणाम घडून आला. स्वातंत्र्य उपभोगण्याचा मूलभूत अधिकार लॉकडाऊनमुळे संपुष्टात आला. प्रवास तसेच मनोरंजनाच्या सवयींना मुरड घालावी लागली. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीशी जुळवून घेण्यात तरुणांना अपयश आले. परिणामी त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला.

आर्थिक अरिष्ट ओढवल्याने कुटुंबाचा खर्च भागविणे कठीण झाले. त्यातूनही आत्महत्या घडल्या.

----------

हे दिवस जातील...

कोविडच्या संकटाने जगभर हाहाकार उडविला. दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले. मात्र, आता परिस्थितीत काहीसा सुधार झाला आहे. व्यापार चक्र पुन्हा सुरू झाले आहे. त्यामुळे हे वाईट दिवस जातील, अशी सकारात्मक भावना रूजवावी लागणार आहे.

-----------

मानसोपचारतज्ज्ञ काय म्हणतात...

निराशेमध्ये गेलेल्या तरुणांसाठी समुपदेशन ही काळाची गरज आहे. कोविडमुळे अचानकपणे झालेला जीवनातील बदल मानवणारा नाही. मात्र, व्यक्तीच्या क्षमतांचा पूर्णपणे वापर केल्यास त्यातून मार्ग काढता येईल.

- डॉ. संतोष गायकवाड, मानसशास्त्र विभाप्रमुख, बोरावके महाविद्यालय.

---------

Web Title: Suicides increased during the Kovid period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.