घारगावला वृध्द शेतकऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: April 22, 2016 00:15 IST2016-04-22T00:05:53+5:302016-04-22T00:15:26+5:30
बोटा : संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील एका वयोवृध्द शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी दुपारी उघडकीस आली.

घारगावला वृध्द शेतकऱ्याची आत्महत्या
बोटा : संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील एका वयोवृध्द शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी घारगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विनायक सटवाजी आहेर (वय ६३) हे तीन दिवसांपासून घरातून निघून गेले होते. गुरूवारी दुपारी एकच्या सुमारास घारगाव परिसरातील एका डाळिंब बागेत वृध्द व्यक्तीचा मृतदेह असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहिले असता सदर मृतदेह हा विनायक आहेर यांचा असल्याचे समजले.
दरम्यान, मृतदेहाजवळ सापडलेल्या बाटलीवरून त्यांनी विषारी औषधाचे सेवन करून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. या प्रकरणी मयताचे भाऊ संपत सटवाजी आहेर यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
(वार्ताहर)