कोपरगाव : शहरातील धारणगाव रोडवरून संजीवनी कारखान्याच्या दिशेने ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक निसटून पडल्याने ट्रेलर उलटला. ही घटना सोमवारी (दि.८) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास माधव बागेसमोर घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सोमवारी ट्रॅक्टर चालक राजेंद्र राठोड हे सिन्नर तालुक्यातील शहा पांचाळे येथून ट्रॅक्टरला डबल ट्रॉली लावून संजीवनी कारखान्यात शेतकऱ्याचा ऊस घेऊन जात होते. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मागील ट्रॉलीच्या चाकातील बेअरिंगचा चुरा झाल्याने चाक निसटून पडले. त्यामुळे उसासह ट्रॉली रस्त्याच्या मधोमध उलटली. सोमवारी कोपरगावचा आठवडव बाजाराचा दिवस असल्याने रस्त्यावर मोठी रहदारी असते. सुदैवाने ही ट्रॉली उलटली तेव्हा आजूबाजूने जाणारे वाहनचालक थोडक्यात बचावले. यावेळी वाहतूक ठप्प झाली होती. शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ही वाहतूक सुरळीत केली होती. दरम्यान, सायंकाळी उशिरा दुसऱ्या ट्रेलरमध्ये रस्त्यावर पडलेला ऊस भरून कारखान्यात नेण्यात आला. ट्रॅक्टरला डबल ट्रॉली लावून नियमबाह्य वाहतूक केल्याबद्दल कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.