ऊस तोडणी कामगारांच्या झोपड्यांना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:20 IST2021-03-15T04:20:27+5:302021-03-15T04:20:27+5:30
संगमनेर : ऊस तोडणी कामगारांच्या तीन झोपड्यांना आग लागून संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे, तसेच रोख रक्कम जळून खाक झाली. ...

ऊस तोडणी कामगारांच्या झोपड्यांना आग
संगमनेर : ऊस तोडणी कामगारांच्या तीन झोपड्यांना आग लागून संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे, तसेच रोख रक्कम जळून खाक झाली. ही घटना तालुक्यातील समनापूर येथे रविवारी (दि.१४) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
समनापूर येथे ऊस तोडणी कामगारांच्या ३० ते ४० झोपड्या आहेत. येथे राहणारे कामगार ऊस तोडणीसाठी गेले होते. दुपारी तीनच्या सुमारास अचानक यातील एका झोपडीला आग लागली. पोलीस पाटील गणेश शरमाळे यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन विभागाला समनापूर येथे ऊस तोडणी कामगारांच्या झोपड्यांना आग लागल्याचे कळविले. काही वेळातच घटनास्थळी अग्निशमन बंब दाखल झाला. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. आगीत तीन झोपड्या पूर्णपणे जळाल्या. या झोपड्यामधील संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे, तसेच रोख रक्कम जळून ऊस तोडणी कामगारांचे मोठे नुकसान झाले. ऊस तोडणी मजुरांना लवकरात लवकर मदत मिळावी, अशी मागणी उपसरपंच जगन चांडे, भास्कर शरमाळे, सोमनाथ शरमाळे, संदीप दळवी, संतोष नेहे आदींनी केली आहे.