साखर तंत्रज्ञांची ससेहोलपट सुरुच

By Admin | Updated: June 17, 2014 00:36 IST2014-06-16T23:56:11+5:302014-06-17T00:36:56+5:30

अहमदनगर : साखर उद्योगातील तंत्रज्ञांना तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत असून, गेल्या तीन वर्षापासून वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली नाही़

Sugar technicians begin to sweat | साखर तंत्रज्ञांची ससेहोलपट सुरुच

साखर तंत्रज्ञांची ससेहोलपट सुरुच

अहमदनगर : साखर उद्योगातील तंत्रज्ञांना तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत असून, गेल्या तीन वर्षापासून वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली नाही़ वेतननिश्चिती समितीची मुदत संपली तरीही या समितीचे कामकाजच झाले नाही़ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, साखर आयुक्त, राज्य सहकारी साखर कारखाना संघाकडे पाठपुरावा करुनही वेतनश्रेणीबाबत अद्याप ठोस निर्णय घेण्यात आला नाही़
राज्यभरात विविध साखर कारखान्यांमध्ये हजारो तंत्रज्ञ काम करीत आहेत़ या तंत्रज्ञांना साखर कारखान्यांकडून तुटपुंज्या वेतनावर राबवून घेतले जाते़ त्यामुळे साखर तंत्रज्ञांना वेतनश्रेणी लागू करावी, अशी मागणी वेळोवेळी राज्य सरकारकडे तंत्रज्ञांनी केली़ मात्र, त्याचा सकारात्मक विचार करण्यात आला नाही़ साखर उद्योगातील तंत्रज्ञांना एकत्रित आणण्यासाठी राज्य साखर कारखाना इंजिनिअर्स व केमिस्ट असोसिएशनची स्थापना १८ आॅगस्ट २०११ रोजी करण्यात आली़ या असोसिएशनकडे राज्यभरातील ३ हजार ५०० हून अधिक तंत्रज्ञ व केमिस्टने नोंदणी केली़ त्यानंतर समितीने राज्यभरात तंत्रज्ञ व केमिस्टचे मेळावे घेतले़ व वेतनश्रेणीचा मुद्दा सरकारकडे लावून धरला़ साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून वेतन निश्चिती समितीवर असोसिएशनचे दोन सदस्य घेण्याचा निर्णय आॅक्टोबर २०११ मध्ये झाला़ मात्र, अद्याप वेतननिश्चिती समितीवर असोसिएशनच्या एकाही सदस्याला घेण्यात आले नाही़ वेतननिश्चिती समिती व वेतन मंडळाची मुदत ३१ मार्च २०१४ रोजी संपली आहे़ मात्र अद्याप साखर उद्योगातील तंत्रज्ञांच्या वेतनश्रेणीबाबत निर्णय घेतला नाही़ साखर कारखाना संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अकलुज येथे वेतनश्रेणीबाबत बैठक झाली़ मात्र, कारखान्यांची आर्थिक स्थिती, गाळप क्षमता त्यानुसार वेतनश्रेणी लागू करण्याची जबाबदारी कारखान्यांवर सोपविण्यात आली़ मात्र, अद्याप एकाही कारखान्याने वेतनश्रेणी लागू केली नाही़ त्यानंतर ३ सप्टेंबर २०१२ रोजी असोसिएशनचे पदाधिकारी व राज्य साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक अजित चौगुले यांची मुंबई कार्यालयात बैठक झाली़ त्यांनी सकारात्मक विचार करण्याचे मान्य केले़ मात्र, त्यावर अद्याप काहीही कार्यवाही झाली नाही़ पुणे येथील वसंतदादा साखर संस्थेनेही तंत्रज्ञांना वेतनश्रेणी लागू करण्याची शिफारस केली आहे़ (प्रतिनिधी)
मनुष्यबळाची कमतरता
साखर कारखान्यांकडून इंजिनिअर व केमिस्टची अवहेलना होत असल्याने अनेक कारखान्यांना अनुभवी तंत्रज्ञ मिळत नाही़ खाजगी कारखाने व इतर उद्योगात तंत्रज्ञांना चांगले पगार दिले जातातक़ारखान्यातील तंत्रज्ञांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी पुणे येथील वसंतदादा साखर संस्थेवर आहे़ मात्र, त्यांच्याकडेही प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रीयन तंत्रज्ञ येत नसून, परराज्यातील तंत्रज्ञ प्रशिक्षण घेऊन पुन्हा परराज्यातील साखर कारखान्यात रुजू होत आहेत़ त्यामुळे महाराष्ट्रात साखर कारखान्यांना तंत्रज्ञ मिळत नाही़
खाजगी साखर कारखाने व इतर उद्योगात तंत्रज्ञांना आमच्यापेक्षा तीन ते चार पट अधिक पगार दिले जातात़ आमच्या मागण्यांचे निवेदन राज्य सरकार, साखर आयुक्त यांना दिले आहे़ त्यांच्याकडे वेतनश्रेणी लागू करण्याबाबत पाठपुरावा सुरु आहे़
-बाळकृष्ण पुरोहित, उपाध्यक्ष
साखर कारखाना इंजिनिअर व केमिस्ट असोसिएशन
चौथ्या वेतनमंडळाची मुदत संपल्याने पाचव्या वेतन मंडळात साखर तंत्रज्ञांचा समावेश करावा़ तात्काळ वेतनश्रेणी लागू करावी, अशा मागण्या सरकारकडे करण्यात आल्या आहेत़
-यशवंत धुरे, अध्यक्ष,
साखर कारखाना इंजिनिअर्स
व केमिस्ट असोसिएशन

Web Title: Sugar technicians begin to sweat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.