असाही एक वारकरी पंढरीचा!
By Admin | Updated: June 26, 2014 00:46 IST2014-06-26T00:08:11+5:302014-06-26T00:46:40+5:30
भाऊसाहेब येवले, राहुरी प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र ताहाराबाद येथून निघालेल्या संत कवी महिपती महाराज दिंडीत श्वानरूपी पांडू सहभागी झाला आहे़
असाही एक वारकरी पंढरीचा!
भाऊसाहेब येवले, राहुरी
प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र ताहाराबाद येथून निघालेल्या संत कवी महिपती महाराज दिंडीत श्वानरूपी पांडू सहभागी झाला आहे़ पांडूची ही पंढरीची सहावी वारी असून, तो अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे़ त्रिंबकपूर, आळंदी, शिर्डी, पैठण अशा वाऱ्या केलेला पांडू मात्र पंढरीची वारी कधी चुकत नाही.
बाबासाहेब झावरे यांनी लाडाने वाढविलेल्या पांडूचा मुक्काम वर्षभर ताहाराबद येथील विठ्ठल मंदिरात असतो़ वारीतील पांडूचा दिनक्रम वारकऱ्यांना थक्क करणारा आहे़ पहाटे काकडा आरती सुरू झाली की पांडू आरतीत सहभागी होतो़ वारकऱ्यांबरोबर पांडूलाही आंघोळ घातली जाते. वारकरी चहा पितात, तर पांडूसाठी दुधाची व्यवस्था करण्यात येते. रथ निघाला की पांडूही भजन म्हणणाऱ्या वारकऱ्यांमध्ये सामील होतो़
जिथे दिंडी जाईल तिथे पांडू वारकऱ्यांबरोबर असतो़ आरती झाल्यानंतर पांडूलाही बुक्का लावला जातो़ शिवाय पांडूच्या गळ्यात हार घालून त्याचा सन्मानही होतो़ गावोगावी पांडूच्या दृष्टिक्षेपात कुत्रे येतात, पण पांडू त्यांना टाळून भांडणापासून दोन हात दूर राहणेच पसंत करतो. वारकरी आराम करण्यास थांबले की पांडूही एखाद्या झाडाखाली पहुडतो. वारकऱ्यांच्या भोजन पंक्तीतच पांडूलाही एक ताट वाढले जाते. तीन वर्षांपूर्वी पांडू पंढरपूरला जाताना चुकलाही होता़ मात्र ध्वनीक्षेपकावरून घोषणा केल्यानंतर परिचयाचा आवाज ऐकून पांडू पुन्हा दिंडीत सहभागी झाला़ पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर पांडू रथाबरोबर ताहाराबादला येतो़ धाकट्या एकादशीला पांडूचा मुक्कात विठ्ठल मंदिरात असतो़ पांडूने आतापर्यंत पैठण, त्रिंबकपूर व शिर्डी दिंडीत तीनदा, आळंदी दिंडीत दोनदा, तर पंढरपूर दिंडीत पाचव्यांदा वारी केली आहे. ही त्याची सहावी वारी आहे, अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब साबळे यांनी दिली़