राज्यातील विद्यार्थ्यांना लागली सुंदर हस्ताक्षराची गोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:18 IST2021-04-19T04:18:28+5:302021-04-19T04:18:28+5:30
‘शाळा बंद तरीही कार्यशाळा सुरू’ ही सातवी ऑनलाइन सहा दिवसीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. याअंतर्गत मार्गदर्शक पाहुणे आपल्या भेटीला ...

राज्यातील विद्यार्थ्यांना लागली सुंदर हस्ताक्षराची गोडी
‘शाळा बंद तरीही कार्यशाळा सुरू’ ही सातवी ऑनलाइन सहा दिवसीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. याअंतर्गत मार्गदर्शक पाहुणे आपल्या भेटीला या कल्पनेनुसार बीड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनवेवाडी येथे कार्यरत असलेले सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शक अनिल बेंद्रे यांनी सहा दिवसांच्या कार्यशाळेमध्ये मराठी सुलेखन व कॅलिग्राफीचे मार्गदर्शन राज्यातील विविध सहभागी विद्यार्थ्यांना केले. या कार्यशाळेचे आयोजन नेवासा शहरातील उपक्रमशील शिक्षक राहुल आठरे, अण्णासाहेब शिंदे, शीतल झरेकर यांनी ऑनलाइन पद्धतीने एकत्र येऊन आभासी पद्धतीने केले.
नुकत्याच संपन्न झालेल्या सहा दिवसीय कार्यशाळेमध्ये गुगल मीट, युट्युब लाइव्हच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थ्यांना बेंद्रे यांनी सखोल मार्गदर्शन केले.
स्ट्रोक अनुसार लेखन कसे करावे, अक्षराचे वळण कसे काढावे, अक्षराची उंची किती असावी, दोन शब्दांतील अंतर, लेखनाची अचूक पद्धती कोणत्या तसेच मराठी देवनागरी व कॅलिग्राफी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. सहभागी विद्यार्थ्यांचा व्हाॅट्सॲपद्वारे ग्रुप तयार करून याद्वारे विद्यार्थ्यांना दररोजचा सराव अभ्यास व मार्गदर्शन याद्वारे केले जात असे. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी संगमनेर डायटचे प्राचार्य डी.डी. सूर्यवंशी हे उपस्थित होते.
या सहा दिवसीय झालेल्या कार्यशाळेसाठी अहमदनगर जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्हा परिषदेच्या व खासगी शाळांतील इयत्ता पहिली ते आठवीचे युट्युब लाइव्हद्वारे सुमारे ७८० विद्यार्थी सहभागी झाल्याचे कार्यशाळा संयोजक राहुल आठरे यांनी या वेळी सांगितले. सहा दिवस चाललेल्या ऑनलाइन कार्यशाळेस विद्यार्थी व पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांनी सुंदर हस्ताक्षराचा सराव चांगल्या प्रकारे केल्याचे दिसून आले आहे.
या वेळी राज्याच्या विविध जिल्ह्यांतील विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते. पालक प्रतिनिधी म्हणून कल्पना गावडे, शिल्पा शिरसाट, विलास वाघ, अपर्णा साबळे, वैभव गोसावी आदींनी विद्यार्थ्यांच्या अक्षरलेखनासाठी कार्यशाळेची उपयुक्तता कशी ठरली हे मनोगतातून व्यक्त केले.
.........
सहा दिवसीय सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेमध्ये मुलांना मुळाक्षरे, जोडाक्षरयुक्त शब्द तसेच वाक्य यांचे अगदी सुलभतेने लेखन कसे करावे याबाबत मार्गदर्शन मिळाले. - अपर्णा साबळे, पालक
............
शाळा बंद असल्याने माझ्या लिखाणात खंड पडल्यामुळे माझे हस्ताक्षर खराब झाले होते. या सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेत सहभागी झाल्यामुळे अक्षरे काढण्याची व लेखनाची अचूक पद्धत समजली.
- तन्मय शिंदे
...........
सोशल मीडियाच्या माध्यमातून सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेत जॉइन होण्याची संधी मिळाली. त्यामुळे माझा मुलगा आरुष व आम्हा पालकांना सुंदर हस्ताक्षर या कार्यशाळेचा योग्य वेळी खूप फायदा झाला.
- शिल्पा शिरसाठ