डंपरखाली चिरडून विद्यार्थी ठार
By Admin | Updated: August 7, 2014 00:06 IST2014-08-06T23:56:08+5:302014-08-07T00:06:57+5:30
संगमनेर : भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरखाली चिरडून शालेय विद्यार्थी जागीच ठार झाल्याची घटना जोर्वे गावात घडली.

डंपरखाली चिरडून विद्यार्थी ठार
संगमनेर : भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरखाली चिरडून शालेय विद्यार्थी जागीच ठार झाल्याची घटना जोर्वे गावात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिवाजी दगडू भांड याच्याविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
जोर्वे येथील विजय मोतीलाल इंगळे यांचा दहावीत शिकणारा मुलगा चंद्रकांत (वय १५) हा सोमवारी रात्री बाळासाहेब जोर्वेकर यांच्या वस्तीवर कार्यक्रमासाठी सायकल घेऊन गेला होता. दरम्यान संगमनेरहून भरधाव वेगाने आलेल्या मुरूमाने भरलेल्या डंपरने (एम.एच.१४, बी.जे. ३०५५) चंद्रकांतला समोरून जोराची धडक दिल्याने तो वाहनाखाली चिरडला गेला. जखमी चंद्रकांतला तातडीने ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले असता तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
याप्रकरणी विजय इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी डंपर चालक आरोपी शिवाजी भांड याच्याविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल खेडकर व शेटे करीत आहेत.
(प्रतिनिधी)