डंपरच्या धडकेने विद्यार्थी ठार
By Admin | Updated: September 3, 2014 23:59 IST2014-09-03T23:37:55+5:302014-09-03T23:59:53+5:30
श्रीरामपूर : खडी घेऊन चाललेल्या डंपरने धडक दिल्याने शाळकरी विद्यार्थी ठार झाला.

डंपरच्या धडकेने विद्यार्थी ठार
श्रीरामपूर : खडी घेऊन चाललेल्या डंपरने धडक दिल्याने शाळकरी विद्यार्थी ठार झाला.
बुधवारी दुपारी श्रीरामपूरजवळील इंदिरानगर-शिरसगाव रस्त्यावरील काळे वस्तीजवळ ही दुर्घटना घडली. याबाबत योगेश दिलीप माने (वय ४०, रा. शिरसगाव) यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.त्यावरून पोलिसांनी अज्ञात डंपर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. खडी घेऊन जाणारा हा डंपर (क्रमांक एम. एच. १५ बी ५३७) काळे वस्तीजवळून चालला होता. या डंपरच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने व निष्काळजीपणाने चालवून समोरून येणाऱ्या सुमित दिग्विजय राजेश माने (वय १४) या विद्यार्थ्याच्या सायकलीस जोरदार धडक दिली. या धडकेत हा विद्यार्थी जागीच ठार झाला. डी. डी. काचोळे विद्यालयाच्या सेमी इंग्रजी विभागाचा सुमित विद्यार्थी होता. तेथून तो आपल्या घरी निघाला होता.
अपघातानंतर डंपर चालक वाहन सोडून पळून गेला. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी या डंपरच्या काचा फोडून त्याला आग लावण्याचा प्रयत्न केला. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचल्याने डंपर आगीपासून वाचला. (प्रतिनिधी)