मोबाईल पालकांजवळ अन् विद्यार्थी घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST2021-07-09T04:14:30+5:302021-07-09T04:14:30+5:30
१०.३० ते ५ या कालावधीत शाळेत शिक्षक असले तरी विद्यार्थ्यांजवळ मोबाईल नसेल तर नुकसान विद्यार्थ्यांचेच आहे, असेही शिक्षकांचे म्हणणे ...

मोबाईल पालकांजवळ अन् विद्यार्थी घरात
१०.३० ते ५ या कालावधीत शाळेत शिक्षक असले तरी विद्यार्थ्यांजवळ मोबाईल नसेल तर नुकसान विद्यार्थ्यांचेच आहे, असेही शिक्षकांचे म्हणणे आहे. राहाता तालुक्यातील बहुतांश विद्यार्थ्यांच्या बाबतीत असेच सत्य आहे. म्हणूनच या विद्यार्थ्यांची शाळा ही पालक घरी आल्यावरच मोबाईल भरते संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत. यंदाच्याही सत्रात शिक्षण हे आभासी माध्यमातूनच सुरू ठेवण्याचे शिक्षण विभागाचे निर्देश आहेत. असे असले तरी शिक्षकांना शाळेमध्ये उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र, राहाता तालुक्यातील वाड्या-वस्त्यावर असलेल्या शाळा अजून उघडण्याची तसदीही येथे काम करणाऱ्या शिक्षकांनी घेतली नसल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
बहुतांशी शिक्षकांची शाळेची वेळ निश्चित करण्यामागे शिक्षण विभागाने काही कारणे दिली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने लसीकरणाची मोहीम तीव्र गतीने राबविण्यात येत असून, तालुक्यातील अनेक शाळास्तरावर लसीकरण, कोविड चाचण्या आदी कार्य सुरू असल्याने शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. याशिवाय तालुकास्तरीय विविध अधिकाऱ्यांच्या गावभेटीही सुरू आहेत. अशावेळी शाळा पूर्णवेळ सुरू राहणे आवश्यक आहे. त्यामुळे १ जुलैपासून तालुक्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळांची वेळ सकाळी १०.३० ते ५ अशी करण्यात आली आहे. काही शाळांमधील शिक्षकांना कर्तव्य बजावयाचे असल्याने या निर्णयाचा स्वीकार केला आहे, पण या वेळेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देताना अडचणी येत आहेत. कारण बहुतांश पालक या वेळेत नोकरीवर कामानिमित्त बाहेर जात असल्याने मोबाईल सोबत घेऊन जातात.
ऑनलाईन शिक्षणाच्या संदर्भात साधनांच्याच अडचणी मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत.
..................
सध्या मुलांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे देण्यासाठी शिक्षक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविताना दिसत आहेत. काही प्रमाणात ऑनलाईन धडे घेण्यासाठी मुले उत्सुक आहेत. मात्र, मोबाईल आणि मोबाईल नेटवर्कची वारंवार येणारी अडचण या शिक्षणाला अडसर ठरत आहे.
-वैभव गोसावी, शिक्षक, जि. प. शाळा, रामपूरवाडी, ता. राहाता.
......................
ऑनलाईन शिक्षण देताना विद्यार्थ्यांजवळ मोबाईल कधी उपलब्ध राहील, हे लक्षात घेऊनच शिक्षण द्यावे लागते. ऑनलाईन शिक्षणास अडचणी येतात, त्यामुळे शाळेत जाऊन गृहभेटीद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यास द्यावा लागतो आणि पालकांच्या वेळेत सकाळी किंवा संध्याकाळी ऑनलाईन अभ्यास वर्ग घेतले जातात, शाळा लवकरात लवकर सुरू होण्याची आम्ही शिक्षक वाट बघत आहोत.
-सतीश मुन्तोडे, तालुकाध्यक्ष, आर्दश बहुजन शिक्षक संघ, राहाता.
..................
आमची मुलगी चौथी वर्गात आहे. आम्ही दोघेही पती-पत्नी कामात व्यस्त असतो. मुलाच्या हातात दिवसभर मोबाईल देणे सोयीस्कर नाही. घरात ज्येष्ठ मंडळी आहेत, पण पूर्णवेळ त्यांच्यावर लक्ष देऊ शकत नाही. सकाळी किंवा सायंकाळी आम्ही घरी असल्याने मुलावर लक्ष ठेवू शकतो. त्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी वर्ग घ्यायला हवे.
- शिवनाथ गायके, पालक, रामपूरवाडी.
080721\img-20210705-wa0107.jpg
लोणी पिंपरी निर्मळ रस्त्यालगत असलेल्या राऊतवस्ती शाळेच्या मुलांना गृहभेटीत मुलांना अध्यापन करताना शिक्षक