खंडणीसाठी विद्यार्थ्याची हत्या

By Admin | Updated: February 28, 2017 17:01 IST2017-02-28T17:01:07+5:302017-02-28T17:01:07+5:30

वीस लाखाच्या खंडणीसाठी तालुक्यातील निमगाव खलू येथील महाविद्यालयीन विद्यार्थी अक्षय राजू पानवकर (वय १७) याचे अपहरण करून हत्या करण्यात आली. ही दुर्दैवी घटना शनिवारी मध्यरात्री घडली.

Student assassination for ransom | खंडणीसाठी विद्यार्थ्याची हत्या

खंडणीसाठी विद्यार्थ्याची हत्या

ऑनलाइन लोकमत
श्रीगोंदा, दि. 28 - वीस लाखाच्या खंडणीसाठी तालुक्यातील निमगाव खलू येथील महाविद्यालयीन विद्यार्थी अक्षय राजू पानवकर (वय १७) याचे अपहरण करून हत्या करण्यात आली. ही दुर्दैवी घटना शनिवारी मध्यरात्री घडली.
या प्रकरणी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी निमगाव खलू येथील दोन अल्पवयीन मुले, तसेच त्यांचे साथीदार अमोल कोकरे (खराडेवाडी, ता. बारामती) अजय मांढरे (रा. उंडवडी. ता. बारामती) व वैभव होले (रा. पारवडी. ता. बारामती) या पाचजणांना अटक केली. यात आणखी एकजण फरार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निमगाव खलू येथील हे दोन्ही अल्पवयीन आरोपी गावात मोलमजुरी करीत होते. या कामातूनच त्यांची इतर आरोपींशी ओळख झाली होती. रोजच्या मोलमजुरी व कष्टाच्या कामाला कंटाळून त्यांनी खंडणी वसुलीची शक्कल लढवली. निमगाव खलूमध्ये राजू पानवकर यांची आर्थिक स्थिती चांगली असल्याने त्यांचा मुलगा अक्षय याचे अपहरण करण्याचा डाव सहाही आरोपींनी रचला.
शनिवारी (दि. २५) संध्याकाळी अल्पवयीन आरोपींनी अक्षयला मोटारसायकलवर बसवून पाटस (ता. दौंड) शिवारातील एका पडक्या बंगल्यात नेले. तेथे आधीच अमोल, अजय, वैभव व आणखी एक असे चौघे हजर होते. अक्षयच्या वडिलांना फोन करून त्यांच्याकडून २० लाख रूपये खंडणी घेण्याचा त्यांचा डाव होता. त्यासाठी त्यांनी अक्षयला मारहाण केली. झटापटीत अक्षयच्या डोक्यात एक उर्मी घाव बसला. त्यातच तो गतप्राण झाला. अक्षयचा मृतदेह तेथेच टाकून आरोपी आपापल्या गावाकडे पळून गेले.
निमगाव खलू येथील दोघे अल्पवयीन आरोपीही गावाकडे निघून आले. रविवारी सकाळी अन्य चार आरोपींनी अक्षयच्या नातेवाईकांना खंडणीसाठी संपर्क केला. अक्षयचे मामा संदीप ढमे यांनी अक्षयच्या अपहरणाची माहिती पोलिसांना दिली. अमोल, अजय व वैभव हे तिघे आरोपी अक्षयच्या नातेवाईकांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलावत होते. दुसरीकडे खंडणीसाठी ज्या क्रमांकावरून फोन येत होता, तो क्रमांक ट्रेस करून पोलीस आरोपींच्या मागावर होते. परंतु पोलिसांना आरोपींचा थांगपत्ता लागत नव्हता. कारण गावातून हे अल्पवयीन आरोपी त्यांना पोलिस व गावकऱ्यांच्या हालचालीची इत्यंभूत माहिती देत होते.
दरम्यान, संशय बळावल्याने सोमवारी पोलिसांनी गावातील अल्पवयीन आरोपीचा मोबाईल ताब्यात घेतला. त्यात त्याने आरोपींशी संपर्क केल्याचे उघड झाले. त्यावरून पोलिसांनी सापळा लावून अन्य आरोपींनाही त्यांच्या गावात जावून अटक केली. अजून एक आरोपी फरार आहे.

दोन महिन्यांपूर्वीच रचना प्लॅन
सहाही आरोपी बांधकाम मजूर होते. सेंट्रिंगची कामे ते करीत होते. रोजच्या कष्टाच्या कामाला कंटाळून त्यांनी दोन महिन्यांपूर्वी हे अपहरण नाट्य रचले. एखाद्या सराईत गुन्हेगारांसारखी तयारी त्यांनी केली होती. या अपहरणनाट्यासाठी त्यांनी १५ दिवसांपूर्वी नवीन सीमकार्ड, नवीन मोबाईल खरेदी केला होता.

निमगाव खलूत तणाव
अक्षय पानवकर हा दौड येथील एका महाविद्यालयात इयत्ता ११ वीत शिक्षण घेत होता. अक्षयच्या मृत्यूमुळे निमगाव खलूमध्ये तणाव होता. पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटोळे, श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक साहेबराव कडनोर यांनी सखोल तपास करून आरोपींना ताब्यात घेतले. मंगळवारी दुपारी निमगाव खलू येथे अक्षयवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Student assassination for ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.