विद्यार्थिनीचा अपहरणाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 23:57 IST2016-07-21T23:47:35+5:302016-07-21T23:57:06+5:30
टाकळी ढोकेश्वर : टाकळीढोकेश्वर (ता.पारनेर) येथील ढोकेश्वर विद्यालयातील दहावीमधील विद्यार्थिनीला कारमध्ये जबरदस्तीने बसवून तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न गुरूवारी सकाळी दहाच्या दरम्यान घडला.

विद्यार्थिनीचा अपहरणाचा प्रयत्न
टाकळी ढोकेश्वर : टाकळीढोकेश्वर (ता.पारनेर) येथील ढोकेश्वर विद्यालयातील दहावीमधील विद्यार्थिनीला कारमध्ये जबरदस्तीने बसवून तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न गुरूवारी सकाळी दहाच्या दरम्यान घडला. मात्र निवडुंगेवाडीचे दोन युवक आल्याने हा प्रयत्न फसला.
टाकळीढोकेश्वर येथील नवोदय विद्यालयानजीक ही विद्यार्थिनी रहाते. ढोकेश्वर विद्यालयात ती दहावीत शिक्षण घेते. गुरूवारी सकाळी दहाच्या सुमारास घरापासून ढोकेश्वर विद्यालयाकडे निघाली असताना एका कारमधून चार तरूण आले. व तोंडे बांधून आलेले दोन तरूण खाली उतरले व त्यांनी त्या विद्यार्थिनीला कारमध्ये जबरदस्तीने ओढून बसविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्या विद्यार्थिनीने ओरडा केल्यानंतर निवडुंगेवाडीकडून दोन तरूण मोटारसायकलवर विद्यालयाकडे रस्त्याने येत असल्याचे अपहरणकर्त्यांना दिसल्यावर ते त्या विद्यार्थिनीला सोडून देऊन फरार झाले. दरम्यान ते निवडुंगेवाडीच्या दोन तरूणांनाही काही प्रकार समजला नसल्याने तेही निघून गेले. मात्र या विद्यार्थिनीने घरी हा प्रकार सांगितल्यावर पोलिसांना माहिती देण्यात आली.
सायंकाळी पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर यांनी संबंधित मुलीकडे चौकशी सुरू केली. रात्री उशिरापर्यंत त्या मुलीकडून पोलीस अधिक माहिती घेत होते.
दरम्यान, या अपहरणाच्या प्रकारामुळे टाकळी ढोकेश्वर परिसरात घबराटीचे वातावरण आहे. याप्रकरणाचा तातडीने तपास लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद झालेली नव्हती. (वार्ताहर)