तोतयाबाबत आळीमिळी गुपचिळी!
By Admin | Updated: June 22, 2014 00:20 IST2014-06-21T23:41:10+5:302014-06-22T00:20:48+5:30
अहमदनगर : विद्यापीठाच्या नावाने फसवणूक करणाऱ्या तोतयाचा ‘बिझनेस’ जोरात सुरू आहे. त्याच्या या गोरखधंद्यात विद्यापीठ आणि पोलिसातील ‘बडी आसामी’ सामील असण्याची शक्यता आहे.

तोतयाबाबत आळीमिळी गुपचिळी!
अहमदनगर : विद्यापीठाच्या नावाने फसवणूक करणाऱ्या तोतयाचा ‘बिझनेस’ जोरात सुरू आहे. त्याच्या या गोरखधंद्यात विद्यापीठ आणि पोलिसातील ‘बडी आसामी’ सामील असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच तोतयाच्या टोळीला मोकळे रान मिळते आहे. वारंवार विद्यापीठाच्या बदनामीला सामोरे जावे लागत असतानाही कोणी बोलण्यास तयार नाही. मात्र, सिनेट सदस्य प्रशांत गडाख यांनी या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे सांगितले.
‘विद्यापीठ उपकेंद्राला तोतयाची बाधा’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’मध्ये शनिवारी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली. काही फसवले गेलेल्यांनीही ‘आम्हाला तुमच्याशी काही बोलायचे आहे. या टोळीविषयी आमच्याकडे माहिती आहे. ती तुम्हाला द्यायचीय,’ अशा आशयाचे दूरध्वनी येत होते.
उपकेंद्रात हजर होण्यासाठी आलेल्या उमेदवारांनी नोंदवहीत नोंदवलेली नावेही दुसऱ्याचीच आहेत. संबंधित व्यक्तीने आज ‘लोकमत’ला ही वस्तुस्थिती निदर्शनास आणून देत होते.
बनावट आॅर्डर प्रकरणातील तोतया पाथर्डीचा आहे. हे उघड गुपित विद्यापीठाचे व्यवस्थापन आणि पोलिसांनाही माहिती आहे. नगर उपकेंद्राचे माजी केंद्र संचालक डॉ. रिंढे यांनी तशी तक्रार दिली होती. तरीही त्याच्याविरूद्ध कारवाई होत नाही. हे गौडबंगाल कायम आहे. ही टोळी फसवणूक करीत असलेल्या घटनेवर ‘लोकमत’ने वेळोवेळी प्रकाश टाकला आहे.
मध्यंतरी या तोतयाने एका महाविद्यालयात रविवारी परीक्षा घेतली. तेथील दोन वर्ग खोल्या त्याच्या दिमतीला दिल्या होत्या. नंतर कागदपत्र तपासणी केली. त्यासाठी ४० हजार रूपये घेतल्याचे संबंधित तरूण सांगतात. त्यामुळे या टोळीत भागीदारांची संख्या मोठी आहे.
विद्यापीठात नोकरीला लावून देतो म्हणून तो तोतया बेरोजगारांकडून पैसे उकळतो. मध्यंतरी त्याने बाबुर्डीच्या जागेवरही दावा सांगण्यास सुरूवात केली होती. नोकरी मिळत नसल्याने पैसे दिलेले तरूण त्याच्याकडे तगादा लावतात. मग तो कॉम्प्युटरवर टाईप करून आॅर्डर काढतो. ती घेऊन तरूण हजर होण्यासाठी उपकेंद्रात चकरा मारतात. तिथे नकार मिळाल्यावर थातूरमातूर कारण देऊन तो वेळ मारून नेतो. पैसे बुडण्याच्या भितीने तक्रार देण्यास तरूण घाबरतात. प्रत्येक वेळी वेगळा फंडा वापरून पैसे उकळले जातात.
वारंवार असा प्रकार घडत असेल, तर ते गंभीर आहे. जिल्ह्यातील सर्व सिनेट सदस्यांसोबत बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढू. तसेच सिनेटमध्ये यावर प्रश्न मांडू. फसवणूक झालेल्यांनीही तक्रार देण्यासाठी समोर यावे, त्यांच्या मागे उभे राहू.
- प्रशांत गडाख, सिनेट सदस्य