बोठेच्या विरोधात पोलिसांकडे भक्कम पुरावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:36 IST2020-12-16T04:36:07+5:302020-12-16T04:36:07+5:30
अहमदनगर: रेखा जरे हत्याकांड प्रकरणात पत्रकार बाळ ज. बोठे याच्या विरोधात पाेलिसांकडे भक्कम पुरावे असून या गुन्ह्यात त्याला जामीन ...

बोठेच्या विरोधात पोलिसांकडे भक्कम पुरावे
अहमदनगर: रेखा जरे हत्याकांड प्रकरणात पत्रकार बाळ ज. बोठे याच्या विरोधात पाेलिसांकडे भक्कम पुरावे असून या गुन्ह्यात त्याला जामीन मंजूर करू नये, असा युक्तीवाद सरकारी पक्षाच्यावतीने जिल्हा न्यायालयात करण्यात आला. या अर्जावर बुधवारी (दि.१६) निर्णय दिला जाणार आहे.
बोठे याच्यावतीने न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करण्यात आलेला आहे. या अर्जावर मंगळवारी जिल्हा, सत्र न्यायाधीश आर.एम. नातू यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी आरोपी पक्षाच्यावतीने ॲड. महेश तवले यांनी युक्तीवाद केला? की, जरे यांची हत्या करावी, असे एकही कारण बोठे याच्याकडे नव्हते. बोठे याने तो काम करत असलेल्य वृत्तपत्रातून हनीट्रॅप संदर्भात लिहिलेल्या बातमीत सागर भिंगारदिवे याला लक्ष्य केले होते. त्यामुळे बोठे आणि भिंगारदिवे हे एकमेकांचे विरोधक होते. अशा परिस्थितीत जरे यांची हत्या करण्यासाठी बोठे हा भिंगारदिवे याला कसा संपर्क करू शकतो, असा प्रश्न तवले यांनी उपस्थित केला. हनी ट्रॅपसंदर्भातील बातम्यांमुळे सदर वृत्तपत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल होऊ शकतात, असेही बोठे याने वृत्तपत्रातून लिहिले होते. भिंगारदिवे याचे नाव घेतले म्हणून बोठे याला अटक करणे संयुक्तीक आहे का? असा युक्तीवाद तवले यांनी केला. यावर जिल्हा सरकारी वकील ॲड. सतीश पाटील यांनी युक्तीवाद केला? की, तपासी अधिकारी यांना जरे यांच्या घरातून त्यांनी लिहिलेले एक पत्र मिळाले आहे. या पत्रात बोठे हा जरे यांचा शारीरिक व मानसिक छळ करत असल्याचे नमूद आहे. जरे यांना आरोपींनी २४ नोव्हेंबर रोजी करंजी घाटातही मारण्याचा प्रयत्न केला? होता. या दिवशी बोठे हा जरे व भिंगारदिवे यांच्या संपर्कात होता. तसेच जरे यांची ३० नोव्हेंबरला हत्या झाली त्या दिवशीही बोठे हा जरे व भिंगारदिवे यांच्या संपर्कात होता. ही बाब पोलिसांनी तपासलेल्या सीडीआरमधून समोर आली आहे. बोठे आणि भिंगारदिवे विरोधक होते तर बोठे याने त्याला वारंवार का? संपर्क केला? असा मुद्दा पाटील यांनी उपस्थित केला. तसेच हत्याकांड घडल्यानंतर बोठे याने जरे कुटुंबियांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. भिंगारदिवे माझे नाव घेऊ शकतो, असे त्याने सांगितले. मात्र बोठे याला हा अंदाज आधीच कसा आला होता. तसेच मयत जरे यांच्या मुलानेही पोलिसांना दिलेल्या पत्रात बोठे याच्यापासून जिविताला धोका असल्याचा म्हटले आहे. हनीट्रॅप संदर्भात पोलिसांकडे एकही तक्रार झालेली नाही. त्यामुळे तो संदर्भ या प्रकरणात संयुक्तीक ठरत नाही, असा युक्तीवाद पाटील यांनी केला.
बोठे याच्या विरोधात आधी दोन गुन्हे
जरे कुटुंबियांचे वकिल ॲड. एस.ए. पटेकर यांनी जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाकडे कागदपत्र सादर करत बाठ बोठे याच्या विरोधात या आधी दोन गुन्हे दाखल झाले होते. असे सांगितले. २००९ मध्ये नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा निकालात निघालेला आहे तर दुसरा गुन्हा हा वृत्तपत्रातून झालेल्या बदनामी संदर्भातील आहे. या संदर्भातील खटला जिल्हा न्यायालयात सुरू असल्याचे सांगितले.
बोठेचा ठावठिकाणा लागेना
जरे हत्याकांडात पोलीस गेल्या पंधरा दिवसांपासून बोठे याचा शोध घेत आहेत. तो मात्र पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत आहे. पाच पोलीस पथके शोध घेत असले तरी बोठे पोलिसांना सापडेना कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे.