पावसाचे दमदार आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST2021-07-09T04:14:51+5:302021-07-09T04:14:51+5:30

अहमदनगर : तीन आठवड्यांपासून हुलकावणी दिलेल्या पावसाचे जिल्ह्यात दमदार आगमन झाले. नगर शहरासह श्रीगोंदा, जामखेड, अकोले तालुक्यात जोरदार पाऊस ...

Strong arrival of rain | पावसाचे दमदार आगमन

पावसाचे दमदार आगमन

अहमदनगर : तीन आठवड्यांपासून हुलकावणी दिलेल्या पावसाचे जिल्ह्यात दमदार आगमन झाले. नगर शहरासह श्रीगोंदा, जामखेड, अकोले तालुक्यात जोरदार पाऊस झाला. अन्य तालुक्यांमध्ये रिमझिम पाऊस झाला. अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला असून आणखी पाऊस आला तर दुबार पेरणीचे संकट टळणार आहे.

जून आणि सात जुलैपर्यंत जिल्ह्यात आतापर्यंत १४२ मिलीमीटर इतका पाऊस झाला. पावसाचे हे प्रमाण के‌वळ ३२ टक्के आहे. गतवर्षी याच काळात ५३ टक्के इतका पाऊस झाला होता. गत १५ दिवस ते तीन आठवड्यांपासून पावसाने ओढ दिली आहे. थोड्या पावसावर आतापर्यंतच शेतकऱ्यांनी ७६ टक्के पेरण्या केल्या आहेत. आता पाऊस आला नाही तर मूग, उडिदाच्या दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे. या चिंतेत शेतकरी असतानाच गुरुवारी जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी कळविल्यानुसार नेवासा, श्रीगोंदा, अकोले, जामखेड, नगर शहर, कर्जत, भंडारदरा परिसर, पाथर्डी, पारनेर तालुक्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. मृग आणि आर्द्रा ही पावसाची दोन्ही नक्षत्रे बहुतांश ठिकाणी कोरडी गेली. ५ जुलैपासून पावसाचे पुनर्वसु नक्षत्र सुरू झाले असून पावसालाही पुन्हा सुरुवात झाल्याने शेतकरी वर्ग आनंदला आहे.

------------

नगर शहरात जोरदार सरी

नगर शहर व परिसरातही पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. दुपारी चारच्या दरम्यान पावसाने जोरदार सुरुवात केली. १५ ते २० मिनिटे सलग पाऊस झाला. नंतर काहीवेळ रिमझिम सुरू होती. पावसाने शहरातील रस्त्यांवरून चांगलेच पाणी वाहिले. सखल भागातही पाणी साचले होते. दुकाने बंद करण्याच्या वेळेलाच पाऊस सुरू झाला. त्यामुळे व्यापारी व ग्राहकांची एकच तारांबळ उडाली. रस्त्यावरील विक्रेत्यांची एकच धावपळ झाली.

-----

फोटो

Web Title: Strong arrival of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.