संगमनेरात माथाडी कामगारांचा संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:18 IST2021-05-15T04:18:55+5:302021-05-15T04:18:55+5:30
या काळात संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. अशी माहिती बाजार समितीचे सचिव सतीश ...

संगमनेरात माथाडी कामगारांचा संप
या काळात संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. अशी माहिती बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ यांनी दिली. राज्यात कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. सर्वत्र रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णांना रुग्णालयात, कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये बेड, ऑक्सिजन बेड मिळणे कठीण होत आहे. बाजार समितीमधील माथाडी कामगार व बाजार समितीचे कर्मचारी हे कोरोना बाधित झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर बनली आहे. त्यामुळे माथाडी कामगार व बाजार समितीमधील कर्मचारी धास्तावले आहेत. शासनाने मुदतीत निर्णय घेऊन त्यांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करावे. तसेच मृत्यू झालेल्या कामगारांना आर्थिक मदत न मिळाल्यास बाजार समितीचे कामकाज बंद ठेवून बेमुदत आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे यापुढे शेतकरी व कामगारांच्या नुकसानीची घटना घडू नये, म्हणून तात्काळ निर्णय घेऊन सहकार्य करावे, असे पत्र सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक यांना सचिव गुंजाळ यांनी पाठविले आहे.
-----------------
कृषी उत्पन्न बाजार समित्या अत्यावश्यक सेवेत येत असताना माथाडी कामगार, बाजार समितीमधील कर्मचारी व व्यापारी यांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करणे गरजेचे आहे. याबाबत शासनाने लवकर निर्णय घ्यावा.
- सतीश गुंजाळ, सचिव, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती, संगमनेर