मंडल अधिकाऱ्यास मारहाण
By Admin | Updated: June 29, 2014 00:28 IST2014-06-28T23:44:52+5:302014-06-29T00:28:22+5:30
राहाता : अवैध गौण खनिज वाहतुकीस अडथळा केल्याने राहाता येथील मंडलाधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली.

मंडल अधिकाऱ्यास मारहाण
राहाता : अवैध गौण खनिज वाहतुकीस अडथळा केल्याने राहाता येथील मंडलाधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा निषेध म्हणून राहाता तलाठी संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
राहात्याचे प्रभारी मंडलाधिकारी चांगदेव गणपत सावंत साकुरी येथील तलाठी कार्यालयात काम करीत असताना तहसीलदार सुभाष दळवी यांनी त्यांना दूरध्वनीवरून एकरुखे येथे अवैध मार्गाने मुरुमचोरी होत असल्याची माहिती दिली. त्यामुळे सावंत संबंधितांवर कारवाई करण्यासाठी एकरूखेकडे रवाना झाले. तेथील तलाठी कामानिमित्त बाहेर गेल्याने सावंत यांनी कोतवालाला बरोबर घेऊन घटनास्थळ गाठले. परंतु तेथे त्यांना कोणीही आढळून आले नाही. सावंत यांनी तसे तहसीलदारांना कळवले.
याबाबत तक्रारदार रवींद्र जगन्नाथ गायधने यांचा जबाब घेऊन सावंत मोटारसायकलवर (एमएच १६-२२९४)राहात्याकडे येत असताना प्रताप सदाफळ (र. १५ चारी, राहाता) व त्याच्या एका साथीदाराने लोखंडी हत्याराने सावंत यांना मारहाण केली. तसेच १० ग्रँमची सोन्याची अंगठी हिसकाकून जीवे मारण्याची धमकी दिली.
राहाता पोलिसांनी सावंत यांच्या तक्रारीवरुन प्रताप सदाफळ याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राहाता तालुका तलाठी संघटना व तहसील कार्यालयाने आरोपीला अटक होत नाही तो पर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. (वार्ताहर)