डॉक्टरांना मारहाण, रुग्णालयाची तोडफोड करणाऱ्यांवर कडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:22 IST2021-05-27T04:22:07+5:302021-05-27T04:22:07+5:30
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पाटील यांनी म्हटले आहे की, नगर जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. ...

डॉक्टरांना मारहाण, रुग्णालयाची तोडफोड करणाऱ्यांवर कडक कारवाई
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पाटील यांनी म्हटले आहे की, नगर जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनाने बाधित झालेले रुग्ण विविध रुग्णांलयात औषधोपचार घेत आहेत. अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दुर्दैवाने काही लोकांना यात प्राण गमवावे लागले. रुग्ण संख्या कमी व्हावी, यासाठी वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर, नर्स व त्यांचा स्टॉफ स्वत:चा जीव धोक्यात घालून अहोरात्र कार्यरत आहेत. मागील काही दिवसांत रुग्णांची सेवा करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील लोकांवर हल्ले झाले आहेत. वैद्यकीय सेवा देणारे सर्वजण रुग्ण बरा होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत असतात. परंतु काही कारणास्तव त्यांना यश येत नाही. अशा वेळी रुग्णांचे नातेवाईक किंवा रुग्णांचे जवळचे लोक वैद्यकीय सेवा देणाऱ्यांस जबाबदार धरून त्यांच्यावर हल्ले करत रुग्णालयांची तोडफोड करतात. मागील काही दिवसांपासून असे हल्ले व रुग्णालयांची तोडफोड करण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्या घटना योग्य नसून संबंधित हल्लेखोर लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे. अशा घटनेनंतर सर्व ते कायदेशीर पुरावे जमा करून अशा हल्लेखोरांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल, यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील असेल. असे पोलीस अधीक्षक पाटील यांनी म्हटले आहे. रुग्णालयात अशा स्वरूपाची काही घटना घडल्यास ०२४१ - २४१६१३२, २४१६१३८ या क्रमांकावर नजीकच्या पोलीस स्टेशनला कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.