पाणी योजनेवरील विद्युतपुरवठा सुरळीत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST2021-07-15T04:16:25+5:302021-07-15T04:16:25+5:30
---------- लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी योजनेवरील विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा ...

पाणी योजनेवरील विद्युतपुरवठा सुरळीत करा
----------
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी योजनेवरील विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत असून, पाणी योजनेवरील विद्युतपुरवठा सुरळीत करा, असा आदेश आमदार संग्राम जगताप यांनी महावितरणला दिला. तसेच मुळानगर येथील प्रस्तावित एक्स्प्रेस फिडर बसविण्याचे काम तातडीने सुरू करण्याचा निर्णय ही यावेळी घेण्यात आला.
‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात दिवसाआड पाणीपुरवठ्यात महावितरणचा खोडा, या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. या वृत्ताची दखल घेऊन आमदार संग्राम जगताप यांनी तातडीने महावितरण व महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वरील आदेश दिला. बैठकीला आयुक्त शंकर गोरे, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सांगळे, उपायुक्त यशवंत डांगे, जल अभियंता परिमल निकम, पाणीपुरवठा विभाग प्रमुख रोहिदास सातपुते, रोहोकले आदी उपस्थित होते.
गेल्या वीस दिवसांपासून पाणी उपसा केंद्रावरील विद्युतपुरवठा वारंवार खंडित झाला. त्याचा थेट परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला. विद्युत पुरवठा ५ मिनिट जरी खंडित झाला तरी पाणी उपसा सुरळीत होण्यास दोन तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे पाणी उपसा केंद्रावरील विद्युतपुरवठा अखंडित सुरू ठेवणे गरजेचे आहे. याबाबत महापालिकेने महावितरणला वेळोवेळी पत्र दिले. परंतु, त्याची दखल महावितरणकडून घेतली गेली नाही. मुळा धरण व विळद घाट येथील पाणी उपसा केंद्र परिसरात एक्स्प्रेस फिडर प्रस्तावित आहे. त्यासाठी महापालिकेने महावितरणकडे २ कोटी ४० लाख रुपये जमा केलेले आहेत. परंतु, हे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे पाणी उपसा केंद्र परिसरातील विद्युतपुरवठा वारंवार खंडित असून, शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो. विद्युतपुरवठा खंडित झाल्याने मुळानगर, विळद, नागापूर येथून होणारा पाणी उपसा बंद पडतो. परिणामी पाण्याच्या टाक्या वेळेवर भरत नसल्याने सर्वच भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे यावेळी महापालिकेकडून सांगण्यात आले.
....
स्वतंत्र पथक स्थापन करण्याच्या सूचना
शहर पाणीपुरवठा योजनेवरील विद्युतपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणने महापालिकेशी समन्वय ठेवून स्वतंत्र पथक स्थापन करण्याच्या सूचना आमदार जगताप यांनी यावेळी केल्या. त्यानुसार पथक स्थापन करण्यात येणार असून, हे पथक महापालिकेशी समन्वय ठेवणार आहे.
...
सूचना: फोटो १४ संग्राम जगताप नावाने आहे.
शहरातील वीजपुरवठा खंडित बाबत आमदार संग्राम जगताप यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बुधवारी बैठक घेतली.