मोकाट कुत्र्यांचा रोज १० जणांवर हल्ला; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
By अरुण वाघमोडे | Updated: December 6, 2023 17:08 IST2023-12-06T17:06:19+5:302023-12-06T17:08:31+5:30
अहमदनगर शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव, महापालिकेचे दुर्लक्ष.

मोकाट कुत्र्यांचा रोज १० जणांवर हल्ला; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
अरुण वाघमोडे,अहमदनगर : नगर शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून रोज दहा ते बारा जणांना कुत्रे चावा घेत असून महापालिकेचे या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत मनपाने आठ दिवसांत उपाययोजना केल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे (ठाकरे गट) राज्य सहसचिव विक्रम राठोड व नगरसेवक योगीराज गाडे यांनी दिला आहे.
राठोड व गाडे यांनी बुधवारी मनपात आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेऊन कुत्र्यांच्या उपद्रवाची भीषणता निदर्शनास आणून दिली. दोन दिवसांपूर्वी तारकपूर येथील एका मुलाला कुत्र्याने चावा घेतला होता. त्या मुलालाही यावेळी मनपात आणले होते. शहरात गेल्या दोन दिवसांत राम सतीश आहुजा, सुहास साळवे (रा. तारकपूर) व गार्गी उमेश काळे यांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे.
महापालिकेने सध्या शहरातील कुत्रे पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याचा ठेका एका संस्थेला दिलेला आहे. शहरात मात्र, दिवसेंदिवस कुत्र्यांची संख्या वाढत असून नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. कुत्र्यांचे निर्बीजीकरण न करताच बोगस बिले काढले जात असल्याचा आरोप यावेळी राठोड यांनी केला.