साईनगरीतील रामनवमी उत्सवाची सांगता

By Admin | Updated: April 16, 2016 23:15 IST2016-04-16T23:04:11+5:302016-04-16T23:15:08+5:30

शिर्डी : गेल्या एकशे पाच वर्षाची परंपरा असलेल्या साईनगरीतील श्रीरामनवमी उत्सवाची शनिवारी विक्रम महाराज नांदेडकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने मोठ्या उत्साहात सांगता झाली.

The story of the Ram Navami celebration in Sainagar | साईनगरीतील रामनवमी उत्सवाची सांगता

साईनगरीतील रामनवमी उत्सवाची सांगता

तीन कोटीचे दान : मराठवाड्यातील भाविकांचे पाण्यासाठी साकडे
शिर्डी : गेल्या एकशे पाच वर्षाची परंपरा असलेल्या साईनगरीतील श्रीरामनवमी उत्सवाची शनिवारी विक्रम महाराज नांदेडकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने मोठ्या उत्साहात सांगता झाली. या काळात भाविकांनी जवळपास २ कोटी ८३ लाख रुपयांची देणगी सार्इंना अर्पण केली़
सकाळी गुरुस्थान मंदिरात कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे व सिमा शिंदे यांच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आला. त्रिसदस्य समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते समाधी मंदिरात पाद्यपूजा करण्यात आली. दुपारी १२ वाजता विक्रम महाराज नांदेडकर यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी कार्यक्रमाने उत्सवाची सांगता झाली़ या तीनही दिवस भाविकांच्या देणगीतून संस्थान प्रसादालयात मोफत मिष्ठान्न प्रसाद भोजन देण्यात आले.
उत्सवासाठी आलेल्या पदयात्रींची निवासाची नि:शुल्क व्यवस्था साईआश्रम दोनमध्ये करण्यात आली. उत्सव कालावधीत सुमारे दोन लाख साईभक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला तर दर्शनरांगेतून दर्शन घेणाऱ्या भाविकांना सुमारे २ लाख ५० हजार बुंदी प्रसाद पाकीटाचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, साईबाबांच्या काळापासून या उत्सवाची जबाबदारी संतकवी दासगणु यांच्याकडे होती़ त्यांचा आश्रम नांदेड जवळील गोेरटे येथे असल्याने प्रारंभापासूनच या उत्सवाला नांदेड, परभणीसह मराठवाड्यातील भाविक मोठ्या संख्येने येत़ अलीकडे राज्याच्या विविध भागातून पालख्या घेवून येणाऱ्या पदयात्रींची संख्या वाढली असली तरी मराठवाड्यातील भाविक आवर्जुन या उत्सवाला हजेरी लावतात़ यंदा दुष्काळ असूनही या उत्सवाला आलेल्या मराठवाड्यातील भाविकांनी अन्य काही नको पाणी द्या, अशी आर्त साद बाबांना घातली़
या उत्सव काळात यंदा दुष्काळाने गर्दी रोडावलेली असली तरी भाविकांनी जवळपास २ कोटी ८३ लाख रुपयांची देणगी सार्इंना अर्पण केली़ यात आॅनलाईनच्या माध्यमातून ७ लाख ३३ हजार, हुंडीमध्ये १ कोटी ८३ लाख, देणगी काऊंटरवर ७४ लाख ९ हजार, विदेशी चलन ५ लाख ८१ हजार, ६ लाख ५८ हजाराचे ३८५ ग्रॅम सोने व २ लाख ४ हजाराच्या पाच किलो चांदीचा समावेश आहे़
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The story of the Ram Navami celebration in Sainagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.