चाळीस कोटी रुपयांच्या कामांची स्थगिती उठविली
By Admin | Updated: April 22, 2016 00:16 IST2016-04-22T00:02:44+5:302016-04-22T00:16:36+5:30
अहमदनगर : फेज टू पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण असल्याचे कारण पुढे करत शासनाने मूलभूत निधीच्या चाळीस कोटी रुपयांच्या निधीच्या खर्चाला दिलेली स्थगिती उठविली आहे,

चाळीस कोटी रुपयांच्या कामांची स्थगिती उठविली
अहमदनगर : फेज टू पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण असल्याचे कारण पुढे करत शासनाने मूलभूत निधीच्या चाळीस कोटी रुपयांच्या निधीच्या खर्चाला दिलेली स्थगिती उठविली आहे, अशी माहिती महापौर अभिषेक कळमकर यांनी दिली. आॅगस्टपर्यंत फेज टू पाणी योजनेचे काम पूर्ण करा, अशी सूचना ही स्थगिती उठविताना दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राथमिक मूलभूत सोईसुविधा योजनेंतर्गत नगर महापालिकेला शासनाने वीस कोटी रुपयांचा निधी दिला. तितकाच निधी महापालिकेला टाकून शहरात चाळीस कोटी रुपयांची कामे करावयाची आहेत. चाळीस कोटी रुपयांच्या निधीतील कामांच्या प्रस्तावास विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली. मात्र त्यानंतर युतीच्या नगरसेवकांनी फेज टू पाणी योजनेसाठी रस्ते खोदाई होणार असून ही खोदाई झाल्यानंतरच हा निधी खर्च करावा. तोपर्यंत निधीतील कामे करू नये अशी मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार शासनाने चाळीस कोटी रुपये निधी खर्चास स्थगिती दिली होती.
आमदार संग्राम जगताप, माजी आमदार दादा कळमकर, महापौर अभिषेक कळमकर यांनी मुंबईत गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चाळीस कोटी रुपयांतील प्रस्तावित कामे होणे कसे गरजेचे आहे, हे सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चाळीस कोटी रुपयांच्या कामांना दिलेली स्थगिती उठविण्याचे आदेश दिले.
फेज टू पाणी योजनेच्या कामांचा या निधीतून प्रस्तावित कामास अडथळा येत नाही, ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. आॅगस्टपर्यंत फेज टू पाणी योजनेचे काम पूर्ण करण्याची सूचना यावेळी देण्यात आली आहे, असेही कळमकर यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)
चाळीस कोटी रुपयांच्या निधी खर्चास मंजुरी देण्यात अडचणी येत असतानाच निधी खर्चाची मुदत संपली होती. त्यामुळे शासनाकडे महापालिकेने मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविला होता. तो विषयही महापौर कळमकर यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना उपस्थित केला. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी हा निधी खर्च करण्यास आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसे आदेश नगरविकास विभागाने काढले असून ते ई-मेलद्वारे महापालिकेला पाठविले असल्याचे कळमकर म्हणाले.