शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By Admin | Updated: April 15, 2016 23:10 IST2016-04-15T23:00:53+5:302016-04-15T23:10:43+5:30
जवळे : शिरूर-निघोज रस्त्यावर पारनेर तालुक्यातील जवळे येथे शेतकऱ्यांनी तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनात सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले.

शेतकऱ्यांचा रास्ता रोको
आणेवारी कमी करा : विश्वनाथ कोरडे यांचा बेमुदत उपोषणाचा इशारा
जवळे : शिरूर-निघोज रस्त्यावर पारनेर तालुक्यातील जवळे येथे शेतकऱ्यांनी तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनात सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले. कुकडीपट्ट्यातील १४ गावातील ५० पेक्षा जादा असणारी आणेवारी कमी करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन नायब तहसीलदार सी. सी. दिवाणे यांनी दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले.
पारनेर तालुक्यातील कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गावात पाण्याअभावी कोट्यवधी रुपयांच्या फळबागा आणि शेतीचे नुकसान झालेले आहे. जवळे, गुणोरे आणि निघोज परिसरातील १४ गावे कुकडीपट्ट्यात मोडतात. येथील गावांची आणेवारी ५० टक्कयांपेक्षा अधिक असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शासन दरबारी कळवले आहे. श्रीगोंदा तालुक्यात कुकडीचे दोन कालवे असताना तेथील गावांची आणेवारी ५० टक्कयांपेक्षा कमी कशी, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
भाजपा तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे यांनी सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेणार नसेल तर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला. शेतकरी तीन तास आंदोलन करत असताना महसूल विभागाचा एकही अधिकारी त्या ठिकाणी आला नाही, ही बाब अत्यंत खेदाची आणि निषेधाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जवळा सोसायटीचे अध्यक्ष शिवाजी सालके यांनी सोसायटीने शेतकऱ्यांना यंदा फळबागासाठी ७ कोटी रुपयांचे कर्ज दिलेले आहे. शासनाने या भागातील फळबागांचा १३ लाख रुपयांचा विमा उतरवलेला आहे. मात्र, विमा कंपनीचा एकही प्रतिनिधी या भागात फिरकला नसल्याचा आरोप त्यांनी केला. हा प्रकार शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासारखा आहे. शेतकरी सोसायट्यांचे कर्ज कसे फेडणार, असा सवाल आंदोलनकर्त्यांच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.
आंदोलनात जवळेचे सरपंच किसन रासकर, राळेगण थेरपाळचे सरपंच कैलास डोमे, गांजीभोयरेचे सरपंच आबासाहेब खोडदे, रासपाचे तालुकाध्यक्ष सतीश गोगडे, प्रदीप सोमवंशी, सुभाष खोसे, मोहन आढाव, बाळासाहेब कारखले आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(वार्ताहर)