संगमनेरात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By Admin | Updated: July 8, 2016 23:33 IST2016-07-08T23:23:28+5:302016-07-08T23:33:43+5:30
संगमनेर: व्यापाऱ्यांनी डाळिंब खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन केले.

संगमनेरात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
संगमनेर: बाजार समितीने व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांकडून आडत न घेण्याची सूचना केल्यानंतर व्यापाऱ्यांनी डाळिंब खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी दुपारी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी व शेतकरी यांच्यात डाळिंब खरेदीवरुन शुक्रवारी सकाळी वादावादी झाली. शेतकऱ्यांनी आपला डाळिंबाचा माल विक्रीसाठी बाजार समितीमध्ये आणला होता. बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आडत वसूल न करण्याचे पत्र दिल्याने व्यापाऱ्यांनी डाळिंबाचा माल खरेदी न करण्याचे धोरण स्विकारले. व्यापाऱ्यांनी माल घेणार नाही अशी कोणतीही सूचना शेतकऱ्यांना दिली नव्हती त्यामुळे व्यापाऱ्यांनी माल खरेदी करावा अशी शेतकऱ्यांची मागणी होती़ मात्र व्यापारी लिलावात सहभागी होत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात ठिय्या आंदोलन केले .
आंदोलनाची माहिती मिळताच उपनिरीक्षक अन्सार इनामदार यांनी शेतकऱ्यांची समजूत घालून त्यांना महामार्गावरुन बाजार समितीच्या आवारात नेले. यावेळी सभापती शंकर खेमनर, उपसभापती सतीश गोडगे, सचिव सतीश गुंजाळ, शेतकरी, व्यापारी यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर चर्चेमध्ये शुक्रवारचा माल शासन नियमाप्रमाणे आडत न घेता खरेदी करण्याचे ठरले. गुरुवारच्या बाजारभावा प्रमाणे डाळिंब माल घेण्याची हमी व्यापाऱ्यांनी दिल्याने हे आंदोलन शेतकऱ्यांनी मागे घेतले. बाजार समिती बेमुदत बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. (प्रतिनिधी)