कांदा उत्पादकांचा राहुरीत रास्ता रोको
By Admin | Updated: July 23, 2014 00:16 IST2014-07-22T23:16:24+5:302014-07-23T00:16:16+5:30
राहुरी : कांद्याची आयात थांबवावी, या मागणीसाठी राहुरी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी मोरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी येथे कांदा उत्पादकांनी रास्ता रोको आंदोलन छेडले़
कांदा उत्पादकांचा राहुरीत रास्ता रोको
राहुरी : कांद्याची आयात थांबवावी, या मागणीसाठी राहुरी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी मोरे यांच्या नेतृत्वाखाली नगर-मनमाड राज्यमार्गावर राहुरी येथे कांदा उत्पादकांनी रास्ता रोको आंदोलन छेडले़ नायब तहसीलदार निवेदन स्वीकारण्यासाठी न आल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत निषेधाच्या घोषणा दिल्या़
मंगळवारी सकाळी अकरा वाजता शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हातात झेंडे व फलक घेऊन घोषणा देत निषेध फेरी काढली़ फेरी मार्केट यार्डसमोर आल्यानंतर घोषणा देत शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन छेडले़ तहसील कार्यालयातील पदाधिकारी निवेदन घेण्यास का आले नाही, असा सवाल शेतकऱ्यांनी केला़ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी शेतकऱ्यांना शांततेचे आवाहन केले़ पाटील यांना आंदोलनकर्त्यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले़
आंदोलकांसमोर बोलताना संघटनेचे तालुकाध्यक्ष रवि मोरे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्या सरकारने शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे़ परदेशातून होणारी कांदा आयात त्वरित बंद न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला़ निर्यात मूल्य शून्य करण्यात यावे व जीवनावश्यक वस्तूंमधून कांदा वगळावा, अशा मागण्या रवी मोरे यांनी केल्या़ आंदोलकांसमोर प्रकाश देठे, दत्ता कवाणे, शिवाजी सागर, प्रताप पटारे यांची भाषणे झाली़ यावेळी भागिरथ पवार, ताराचंद तनपुरे, दादासाहेब निमसे, गंगाधर जाधव, सतीष पवार, सुनील मोरे, सचिन पावले, राहुल करपे, पंडित शिरसाठ, ज्ञानदेव निमसे, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते़
(तालुका प्रतिनिधी)
पुतळा जाळण्याचा प्रयत्न
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोकाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळण्यासाठी आणला़ कार्यकर्ते पुतळा पेटविण्याची तयारी करीत असताना पोलिसांनी धावत जाऊन पुतळा ताब्यात घेतला़ अच्छे दिन कहा है, असा सवाल शेतकऱ्यांनी यावेळी केला़