‘मुळा’त १५ जुलैपर्यंतचा साठा
By Admin | Updated: April 6, 2016 00:15 IST2016-04-06T00:07:29+5:302016-04-06T00:15:42+5:30
अहमदनगर : नगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणात १५ जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.

‘मुळा’त १५ जुलैपर्यंतचा साठा
अहमदनगर : नगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणात १५ जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेने बांधकामास पिण्याचे पाणी वापरास निर्बंध घातले असून नळांनाही मीटर बसविले जाणार आहेत. शहरातील जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश आयुक्त विलास ढगे यांनी दिले आहेत.
मुळा धरणाची क्षमता २६ हजार दशलक्ष घनफूट असून धरणात ७ हजार ४३२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. धरणातील पाण्याची पातळी १ हजार ७६५ फूट आहे. पाण्याची पातळी १ हजार ७५२ फुटाच्या खाली गेली तर शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो. पाटबंधारे विभागाकडूनही पाणी कपातीची शक्यता नाकारता येत नाही.
त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा भाग म्हणून शहरातील बांधकामांना वापरण्यात येणारे पिण्याचे पाणी वापरास प्रतिबंध घालण्यात आला आहे. नळांना मीटर बसविण्यात येणार आहेत. शहरातील हॉटेल/उपहारगृहांत अर्धा ग्लास पाणी देण्याची सूचना करण्यात आली आहे.
(प्रतिनिधी)