बिगारींच्या हाती अग्निशमन बंबाचे स्टेअरिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:24 IST2021-03-01T04:24:30+5:302021-03-01T04:24:30+5:30

अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात २७ पैकी तब्बल १९ कर्मचारी अप्रशिक्षित असून, केवळ ८ जण प्रशिक्षित आहेत. त्यामुळे ...

Steering of fire extinguisher in the hands of bigari | बिगारींच्या हाती अग्निशमन बंबाचे स्टेअरिंग

बिगारींच्या हाती अग्निशमन बंबाचे स्टेअरिंग

अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात २७ पैकी तब्बल १९ कर्मचारी अप्रशिक्षित असून, केवळ ८ जण प्रशिक्षित आहेत. त्यामुळे आगीपासून बचाव करण्याची महत्त्वाची जबाबदारी असलेल्या अग्निशमन विभागाचा कारभारच बिगारींच्या हाती आहे. त्यामुळे शहराची सुरक्षा रामभरोसे असल्याचे यावरून स्पष्ट होते.

शहरातील लोकवस्ती झपाट्याने वाढत आहेत. नवीन इमारती उभ्या राहत आहेत. सुमारे चार लाख लोकसंख्या असलेल्या नगर शहरात नवीन इमारतींबरोबरच जुन्या इमारतींची संख्याही मोठी आहे. आगीच्या घटना घडतात. अशा वेळी महापालिकेची यंत्रणा सक्षम असणे अपेक्षित आहेत. महापालिकेच्या सावेडी कचरा डेपोला मागील वर्षी आग लागली होती. ही आग विझविण्यासाठी राहुरी व कोपरगाव येथून बंब बोलवावे लागले होते. महापालिकेच्या अग्निशमन बंबाला कचरा डेपोची आग नियंत्रणात आणता आली नाही. त्यामुळे अग्निशमन विभागावर टीका झाली. हा विभाग समक्ष करण्याकडे मात्र प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागात एकूण २७ कर्मचारी आहेत. त्यापैकी ८ कर्मचारी प्रशिक्षित आहेत. उर्वरित १९ कर्मचारी अप्रशक्षित आहेत. पाणीपुरवठा, बांधकाम यासह इतर विभागांत बिगारी म्हणून कामावर रुजू झालेल्यांची नियुक्ती अग्निशमन विभागात करण्यात आलेली आहे. त्यामुळे मोठी आग लागल्यास हे कर्मचारी आग नियंत्रणात आणू शकतील का, याबाबत साशंकता आहे.

....

अग्निशमन विभागातील ९६ पदे रिक्त

महापालिकेच्या अग्निशमन विभागासाठी एकूण १२३ पदे मंजूर आहेत. ही पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाकडे पाठविण्यात आला आहे; परंतु अद्याप त्यास मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे या विभागातील ९६ पदे रिक्त असल्याने आग विझविताना अडचणी येतात.

....

निधीअभावी नवीन बंबाची खरेदी लांबली

महापालिकेच्या अग्निशमन विभागात दोन बंब आहेत. हे दोन्ही बंब जुने झालेले आहेत. नवीन एक बंब खरेदीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, त्यास मंजुरी मिळाली नाही. जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठविण्यात आला; परंतु जिल्हा नियोजनमध्ये नवीन वाहन खरेदीसाठी निधी मिळत नाही. त्यामुळे साहित्य खरेदीसाठी ६० लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून साहित्य खरेदी केले जाणार आहे.

...........

- महापालिकेच्या अग्निशमन विभागासाठी १२३ पदे मंजूर आहेत. मात्र, सध्या २७ कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी १९ कर्मचारी हे बिगारी असून, उर्वरित ८ कर्मचारी प्रशिक्षित आहेत. हे कर्मचारी बऱ्याच वर्षांपासून या विभागात कार्यरत असल्याने त्यांना बऱ्यापैकी माहिती झाली आहे.

- शंकर मिसाळ, प्रमुख, अग्निशमन विभाग, महापालिका

Web Title: Steering of fire extinguisher in the hands of bigari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.