पडकी शाळा बनली राज्याचे शैक्षणिक पर्यटन
By Admin | Updated: December 1, 2014 14:49 IST2014-12-01T14:49:57+5:302014-12-01T14:49:57+5:30
जी शाळा पडकी शाळा म्हणून हिणवली जात होती तीच आज देशाची शैक्षणिक पर्यटन म्हणून नावलौकिक पावत आहे 'ही आवडते मज मनापासुनी शाळा' या ओळींचे अनुकरण घडते आहे याच शाळेत.

पडकी शाळा बनली राज्याचे शैक्षणिक पर्यटन
अहमदनगर : कधीकाळी गावची पडकी शाळा, गावकर्यांचे शाळेकडे दुर्लक्ष, दोनच शिक्षक आले तर आले, विद्यार्थ्यांचेही तसेच. शाळेविषयी कुणाला आस्था राहिली नव्हती. पण आता हे सर्व इतिहासजमा झाले आहे. जी शाळा पडकी शाळा म्हणून हिणवली जात होती तीच आज देशाची शैक्षणिक पर्यटन म्हणून नावलौकिक पावत आहे 'ही आवडते मज मनापासुनी शाळा' या ओळींचे अनुकरण घडते आहे याच शाळेत.
हिवरेबाजार, राज्यालाच नव्हे तर देशाला एक आदर्श गाव म्हणून परिचित आहे. येथील पाणलोट, जलसंवर्धन, जलसंधारण आदी कामांची पाहणी करण्यासाठी हजारो अभ्यासक व पर्यटक गावाला भेटी देतात. परंतु गावात आलेल्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते ती हिवरेबाजारची जि.प.ची प्राथमिक शाळा. म्हणून प्रत्येक पर्यटकाचे पाय आपोआप शाळेच्या दिशेने वळतात. त्यामुळेच ही शाळा शैक्षणिक पर्यटन म्हणून नावारूपास आली आहे. १९८९ मध्ये क्रिकेटमध्ये करिअर करू पाहणार्या पोपटराव पवार नावाच्या तरुणाने गावाची जबाबदारी घेतली आणि दुर्लक्षित आणि सरकारी कर्मचार्यांसाठी शिक्षेचे ठिकाण असणार्या हिवरेबाजारचे भाग्य बदलले. गावाच्या विकासाची सुरुवातच जि.प.च्या प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीपासून झाली आणि गेल्या २0 वर्षांपूर्वी पडकी असणारी ही शाळा शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात विविध पारितोषिकांची मानकरी ठरली.
दोन शिक्षकी असणारी आणि फक्त चौथीपर्यंतच असणार्या या शाळेत आता सात शिक्षक आणि शिक्षण सातवीपर्यंत झाले. शाळेकडे दुर्लक्ष करणारे गावकरी आता शाळेच्या विकासाबाबत जागरूक झालेत. म्हणूनच या शाळेत सर्व भौतिक सुविधा लोकसहभागातून उपलब्ध झाल्या. शाळेच्या व्हरांड्यातील गावाचे व शाळेचे जुने छायाचित्रच शाळेत झालेल्या बदलाचे साक्ष देते. व्हरांड्यातील राष्ट्रपुरुषांचे फोटो, फलकावरील मजकूर कर्तत्वाची जाणीव करून देतात.
'ही आवडते मज मनापासुनी शाळा' या ओळी विद्यार्थी फक्त गुणगुणतच नाहीत तर आनंदाने सकाळीच स्वच्छ गणवेशात उपस्थित राहून शाळेच्या परिसराची काळजी घेताना दिसतात. वर्गातील सजावट, बोलके फळे, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेसाठी आवश्यक असणारा आरसा, नेलकटर, कंगवा, साबण, टुथ पावडर, तेल, नॅपकिन आदी सुविधा आहेत. पर्यटकांनी विचारलेल्या प्रश्नांची विद्यार्थी हजरजबाबीपणे उत्तरे देतात. शाळेसमोरील हिरव्यागार गालीचा प्रमाणे दिसणारी लॉन, पेव्हर ब्लॉक, प्ले पंप, सौर पंप, शाळेला मिळणारी सौर व पवन ऊर्जा, विद्यार्थ्यांसाठी श्रमदानातून केलेले भव्य क्रीडांगण, संगणक कक्ष, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय. या सर्व सुविधा गावकर्यांनी 'एक दिवस शाळेसाठी' या उपक्रमातून मिळाल्या आहेत. आदर्शगाव संकल्प समितीचे राज्याचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत सुसंस्कारित पिढी घडत आहे.
(प्रतिनिधी)
■ १९९९-२000 - जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार.
■ २00७-२00८- गुणवत्ता विकास कार्यक्रमात जिल्ह्यात प्रथम.
■ २0१२-२0१३- शाळा स्वयंमूल्यमापनात तालुक्यात दुसरा व जिल्ह्यात तृतीय क्रमांक.
■ रोहिदास पादीर, विजय ठाणगे या शिक्षकांना जि.प.चा आदर्श शिक्षक पुरस्कार.