नगर-कोपरगाव रस्त्याबाबत राज्यपालांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:30 IST2021-02-26T04:30:09+5:302021-02-26T04:30:09+5:30
अहमदनगर : नगर-कोपरगाव रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असल्याने या रस्त्यावरील अपघाताची मालिका सुरूच असून आतापर्यंत अनेकजण मृत्युमुखी पडत ...

नगर-कोपरगाव रस्त्याबाबत राज्यपालांना निवेदन
अहमदनगर : नगर-कोपरगाव रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असल्याने या रस्त्यावरील अपघाताची मालिका सुरूच असून आतापर्यंत अनेकजण मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना सरकारला द्याव्यात, असे निवेदन डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिले. कोश्यारी यांना हनुमानाची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रशांत बंब आदी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे, नगर-कोपरगाव रस्त्याचे काम व्हावे, यासाठी आम्ही गेल्या ६ वर्षांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत. गडकरी यांनी या रस्त्याच्या कामाला मंजुरी दिलेली असून आता या रस्त्याची निविदा प्रक्रिया सुरु आहे, परंतु अजून रस्त्याचे काम सुरु झालेले नाही. या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. अपघातामध्ये एका आठवड्यात ३ जण दगावले आहेत. या रस्त्याची दुरुस्ती तातडीने होणे गरजेचे आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे वारंवार मागणी केली आहे. शिर्डीला परराज्यातून येणाऱ्या साईभक्तांनाही या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रास होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.