श्रीरामपूर : मतदारसंघात ग्रामस्थांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरला शासकीय मदत मिळाल्यास मोठ्या उमेदीने व सेवाभावाने सुरू झालेली ही सेवा सुलभतेने चालवण्यास मदत होईल, असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले. कोविड सेंटरला सर्व आवश्यक ती मदत पुरविण्याची सूचना कानडे यांनी तहसीलदार यांना केली.
आमदार कानडे यांनी राहुरी व श्रीरामपूर तालुक्यात गावोगावी भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद केला. विलगीकरण कक्ष स्थापन करण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहन दिले. गाव कारभाऱ्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या कोविड सेंटरची त्यांनी पाहणी केली.
टाकळीभान येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरचे आमदार कानडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, पंचायत समिती सदस्य डॉ. वंदना मुरकुटे, उपसरपंच कान्हा खंडागळे, सर्जेराव कापसे, विष्णूपंत खंडागळे, सुनील बोडखे, ग्रामसेवक रामदास जाधव, विलास सपकाळ उपस्थित होते.
यानंतर भेर्डापूर येथे लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला त्यांनी भेट दिली.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गृह विलगीकरण बंद करून संस्थात्मक वर्गीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये रुग्णांना दाखल करणे गरजेचे आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सेंटरमधील रुग्णांची दैनंदिन तपासणी केले पाहिजे. एक आरोग्य कर्मचारी तेथे नियुक्त करावा. आवश्यक औषधांची मागणी तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडे करावी.
याप्रसंगी सरपंच नामदेव कांदळकर, उपसरपंच प्रताप कवडे, बाबासाहेब पवार, अनिल दांगट, बाळासाहेब धनवटे, लक्ष्मण कवडे, महेश बडाख उपस्थित होते.
देवळाली प्रवरा येथील सहारा कार्यालयातील शासकीय सेंटरमध्ये रुग्णांचे व्यायाम व योगासनांची प्रात्यक्षिके पाहून कानडे यांनी आनंद व्यक्त केला.
--------
फोटो ओळी : कानडे
टाकळीभान येथील कोविड सेंटरची पाहणी करताना आमदार लहू कानडे, कान्हा खंडागळे आदी.
------