राज्य अजिंक्यपद हॉकी स्पर्धेस प्रारंभ

By Admin | Updated: January 14, 2016 23:00 IST2016-01-14T22:43:09+5:302016-01-14T23:00:22+5:30

अहमदनगर : जिल्हा हॉकी असोसिएशन, अहमदनगर महानगरपालिका, जिल्हा क्रीडाअधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेला गुरुवारी प्रारंभ झाला़

Start of state championship hockey tournament | राज्य अजिंक्यपद हॉकी स्पर्धेस प्रारंभ

राज्य अजिंक्यपद हॉकी स्पर्धेस प्रारंभ

अहमदनगर : जिल्हा हॉकी असोसिएशन, अहमदनगर महानगरपालिका, जिल्हा क्रीडाअधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेला गुरुवारी प्रारंभ झाला़ या स्पर्धेतून रांची येथे होणाऱ्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे़
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, औरंगाबाद, सोलापूर, जळगाव, अकोला, जालना, उस्मानाबाद, अमरावती, नाशिक, धुळे, नंदुरबार, बीड, लातूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नांदेड, क्रीडा प्रबोधीनी अशा २२ संघातील ४४० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत़
आदेश शिंदे या खेळाडूने स्पर्धकांना शपथ दिली़ विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले़ यावेळी आ़ संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, माजी आमदार प्रसाद तनपुरे, दादाभाऊ कळमकर, शंकरराव घुले, रंगनाथ डागवाले, महापालिकेचे उपायुक्त भालचंद्र बेहरे आदी उपस्थित होते़ स्पर्धेतील प्रदर्शनीय सामना नगर व नाशिक यांच्यामध्ये झाला़
स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी दुपारी होणार आहे़ ५० पंच व तांत्रिक अधिकारी, हॉकी संघटनेचे ५० पदाधिकारी, ५० स्वयंसेवक या स्पर्धेसाठी परिश्रम घेत आहेत़ खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था संघटनेच्यावतीने करण्यात आली असून, शुक्रवारी सकाळी आठ वाजता स्पर्धेतील पहिला सामना बीड व नाशिक या संघांदरम्यान होणार आहे़ दिवसभरात अकरा सामने होणार असून, यातील विजेत्यांची लढत शनिवारी होणार आहे़
(प्रतिनिधी)
विखे यांच्या कानपिचक्या
क्रीडा संकुलाची दुरवस्था संपून खेळाकडे मुलांचे आकर्षण वाढेल, खेळाडू मैदानात येतील, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे़ राज्य सरकार व जिल्हा नियोजन समितीकडून खेळासाठी व मैदानांसाठी निधी मिळणे आवश्यक आहे़ क्रीडा संघटनांमधील वाद संपले पाहिजेत़ क्रीडा संघटनेचे पदाधिकारी वादातून वेळ मिळाल्यानंतरच खेळाकडे लक्ष देतात, अशा कानपिचक्या विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी दिल्या़ तसेच क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनासाठी राज्य, राष्ट्रीय स्तरावरील नामांकित खेळाडूंना निमंत्रित करायला हवे, असा सल्लाही त्यांनी दिला़

Web Title: Start of state championship hockey tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.